12 December 2017

News Flash

डेंग्यूचा धसका!

तुमच्या घरातील शोभेच्या झाडांच्या कुंडय़ांमध्ये अथवा प्लास्टिकच्या बादलीमध्ये पाणी साठलेले असेल तर सावधान. मलेरियापेक्षा

विशेष प्रतिनिधी | Updated: December 11, 2012 12:17 PM

तुमच्या घरातील शोभेच्या झाडांच्या कुंडय़ांमध्ये अथवा प्लास्टिकच्या बादलीमध्ये पाणी साठलेले असेल तर सावधान. मलेरियापेक्षा घातक असलेला डेंग्यू तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे घरात अथवा परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या. डेंग्यूचा धसका केवळ मुंबईतच नाही तर राज्यात आणि देशातही निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी एकटय़ा मुंबईत ४१६ जणांना डेंग्यूची लागण झाली होती तर यंदा ९०७ जणांना ही लागण झाली असून आतापर्यत सातजणांचे बळी गेले आहेत. राज्यातही आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेले आहेत. दिवसा चावणाऱ्या या डासांपासून सावध राहण्याचा इशारा महापालिकेने तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. ताप आला तर दुर्लक्ष करू नका, असे पालिकेच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगतले. रविवारी चार वर्षांच्या तसनीमच्या मृत्यूने मुंबईकर खडबडून जागे झाले आहेत. ५ डिसेंबर रोजी तिचे वडिल तारिक जाफरी यांचाही डेंग्यूनेच मृत्यू झाला होता. सध्या तिची आई शकिलावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बरेचवेळा ताप आला तरी क्रोसिन अथवा पॅरासिटामल घेऊन तापाकडे दुर्लक्ष केले जाते. डेंग्यूच्या डासाने चावा घेतला असेल तर परिस्थिती पाहाता पाहाता हाताबाहेर जाऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.    
* आकडेवारी बघितली तर देशभरात डेंग्यूचे थैमान कसे वाढत चालले आहे हे लक्षात येईल. २०१० साली देशात २८,२९२ जणांना डेंग्यू झाला व ११० लोकांचा मृत्यू झाला. २०११साली १९ हजार लोकांना डेंग्यू झाला मात्र १६९ जणांचा डेंग्यूने बळी घेतला तर २०१२ साली यात प्रचंड वाढ होऊन ३७ हजार लोकांना डेंग्यूची लागण झाली आणि २२७ जणांचा बळी गेला आहे.

* मुंबईत गेल्या वर्षी डेंग्यूने तीन जण दगावले तर यंदा सात जणांचा मृत्यू झाला. वरकरणी हे प्रमाण फार नसले तरी महापालिकेने हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याबरोबरच या प्रश्नावर व्यापक जनजागृतीचा कार्यक्रमही पालिकेने हाती घेतला आहे.

लक्षणे
’ प्रचंड ताप, डोकेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, उलटय़ा तसेच डोळे दुखणे आणि चट्टे उठणे ही डेंग्यूची काही लक्षणे आहेत. मात्र या परिस्थितीत सध्या तरी कोणतेही ठोस असे औषध यावर नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विश्रांती घेणे, द्रवपदार्थाचे भरपूर सेवन आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यास पहिल्या टप्प्यातील डेंग्यू आटोक्यात येऊ शकतो. पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’तील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यूच्या विषाणूंचे ‘डिइएन-१ ते डिइएन-४’ असे चार प्रकार आहेत. डिइएन-१ प्रकारच्या विषाणूंवर उपचार होऊ शकतात. मात्र डिइएन-२ विषाणूंपासून खूपच सावध रहावे लागते.
काळजी काय घ्यावी?* कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेत वा डासप्रतिबंधक क्रीम वापरावे.
* अगदी प्लास्टिकमध्ये साचलेल्या थोडय़ाशा पाण्यातही या डासांची पैदास होते. तसेच घरी साठविल्या गेलेल्या पाण्यावर असलेले झाकण थोडेसे उघडे असले तरी पैदास शक्य. फक्त पाणी बदलणे पुरेसे नाही तर त्याआधी संबंधित पिंप वा टाकी स्वच्छ पुसणे आवश्यक.
* घरात असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून त्या उन्हात सुकवणे.
* लक्षणे दिसल्यास भरपूर पाणी प्यावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधांमध्ये अ‍ॅस्पिरीन घेणे टाळावे.
* साधा ताप आला व डोके दुखत असले तरी तात्काळ तपासणी करून तज्ज्ञ डक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करणे आवश्यक आहे.

First Published on December 11, 2012 12:17 pm

Web Title: shock of dengue
टॅग Dengue,Health,Mosquito