झटपट प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याचे एक माध्यम म्हणून चित्रपटसृष्टीकडे पूर्वापार पाहण्यात आले आहे. मात्र चित्रपटसृष्टीत नावारूपाला येण्यासाठी प्रचंड मेहेनत आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागते, याचा विचार कोणीच करत नाही. रंगकर्मीच्या आयुष्यात एकांकिका स्पर्धाचे जे स्थान असते, तेच स्थान चित्रकर्मीच्या जडणघडणीत लघुपटांचे असते. हे लक्षात घेऊन मराठी चित्रपटसृष्टीतील तीन प्रयोगशील दिग्दर्शक एकत्र आले आहेत. चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी उत्सुक असलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उमेश कुलकर्णी, रवी जाधव आणि विजू माने हे तिघे ठाण्यात ‘शूट ए शॉर्ट’ ही कार्यशाळा घेणार आहेत. यासाठी ठाणे आर्ट गिल्ड ही संस्थाही त्यांच्यासह सहभागी झाली आहे. ही कार्यशाळा २५ ते २८ एप्रिल दरम्यान ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़संकुलात होणार आहे.
मराठी चित्रपटांच्या विषयांमध्ये वैविध्य येण्यास सुरुवात झाल्यापासून अनेकांच्या नजरा चित्रपटसृष्टीकडे वळल्या. यात महाराष्ट्रातील अगदी खेडय़ापाडय़ातील तरुणांचाही समावेश आहे. हे तरुण आपापल्या परीने लघुपट आणि माहितीपट तयार करत असतात. मात्र त्यांना चित्रपटाची परिभाषा काय आहे, याची माहिती नसते. त्यामुळे या लघुपटांची भट्टी बिघडते. या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी अशी कार्यशाळा घेण्याचा विचार डोक्यात आल्याचे रवि जाधव यांनी सांगितले.
‘बालगंधर्व’, ‘नटरंग’ आणि ‘बीपी’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा रवि जाधव, ‘देऊळ’सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा आणि ‘गिरणी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी असे दिग्गज ही कार्यशाळा घेणार आहेत. या कार्यशाळेत लघुपटासाठीच्या कथाबीजापासून सादरीकरणाचा फॉर्म, पटकथालेखन, साउंड डिझाइन, संकलन, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, कलाकार निवड अशा सगळ्याच अंगांचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येईल.
या कार्यशाळेसाठी जागा मर्यादित असून ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. नोंदणीसाठी ९०२२२२७९९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.