अक्षयतृतीयेचा महत्त्वाचा मुहूर्त असतांनाही कोल्हापूर शहरातील दुकाने सोमवारी बंद होती. एलबीटीकराला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील दुकाने सलग चौथ्या दिवशी बंद होती. सराफ पेठेतील निम्मी दुकाने सकाळी सुरू झाली होती. मात्र, अन्य व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने ती दुपारनंतर बंद करण्यात आली. हा प्रसंग वगळता बंद शांततेत पार पडला. मात्र बंदमुळे मुहूर्तावर खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. ग्राहकांना वेठीस धरणारे हे आंदोलन शासनाने मोडून काढावे, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत होती.    
स्थानिक कराला विरोध दर्शविण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार बंदचा चौथा दिवस होता. सोमवारी अक्षयतृतीया असल्याने व्यापारी कांही प्रमाणात दुकाने उघडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र व्यापारी वर्गाची एकजूट राहिल्याने ती फोल ठरली. सर्वच प्रकारची दुकाने बंदमध्ये सहभागी झाल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.     
अक्षयतृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असते. या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आणि सोने खरेदी करून घरी परतायचे अशी अनेक कुटुंबांची वर्षांनुवर्षांची प्रथा आहे. ही प्रथा आज मोडली गेली. ग्राहकांचा आजच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा कल लक्षात घेऊन सराफांच्या एका संघटनेने दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुजरीतील सुमारे ५० टक्के दुकाने सुरू झाली होती, असा दावा या गटाकडून केला गेला. सराफ दुकाने उघडल्याचे पाहून अन्य व्यापाऱ्यांनी तसेच सराफांनी आक्षेप घेतला. त्यांनी सराफ संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक रणजितपरमार यांच्याशी हुज्जत घातली. त्यातून दोंन्ही गटात वादावादी झाली. व्यापार बंदचे बेमुदत आंदोलन सुरूअसतांना सराफांनी त्यामध्ये विघ्न आणू नये, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली गेली. यानंतर दुकान उघडे ठेवलेल्या सराफांची बैठक होऊन दुकान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक दुकाने बंद पाडल्याचा आरोप या गटाकडून केला गेला. हा प्रकार वगळता आजचा बंद शांततेत पार पडला.    
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी केले आहे. केंद्र व राज्य पातळीवर याबाबत एक-दोनदिवसात निर्णय होणार आहे, तोवर व्यापाऱ्यांनी धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.