पाश्चात्य देशांमध्ये भरभराटीत असलेली लघुपट संस्कृती भारतातही फोफवावी, यासाठी ‘युनिसेफ’ आणि ‘झेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स’ यांच्यातर्फे आयोजित लघुपट महोत्सव आणि स्पर्धा येत्या शनिवारी, ७ डिसेंबर रोजी प्रेस क्लब येथे होणार आहे. या लघुपट महोत्सवात विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले २० लघुपट दाखवण्यात येणार आहेत. प्रत्येकी दोन मिनिटांचे हे लघुपट बालमजुरी, लैंगिक शोषण, स्त्रीभ्रूणहत्या, कुपोषण अशा विषयांवर आधारित आहेत. या लघुपट स्पर्धेसाठी अशोक राणे आणि गणेश पंडित हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
भारतात आणि प्रामुख्याने मुंबईसारख्या अठरापगड वस्ती असलेल्या शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी, लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे याव्यात, या विचाराने झेविअर इन्स्टिटय़ुट ऑफ कम्युनिकेशन्स आणि युनिसेफ यांच्यातर्फे गेली दोन वर्षे लघुपट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेत मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील २० महाविद्यालयांनी भाग घेतला आहे. यात औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध शहरांतील महाविद्यालयांचा समावेश आहे.
यंदा या लघुपट स्पर्धेची संकल्पना लहान मुलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या, अशी आहे. यात बालकांचे हक्क, स्त्रीभ्रुणहत्या, बालमजुरी, शिक्षणापासून वंचित असलेली मुले, कुपोषण, लहान मुलांचे लैंगिक शोषण या विषयावरील लघुपट विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. विशेष म्हणजे या दोन मिनिटांच्या लघुपटांसाठी या विद्यार्थ्यांनी १५ ते २० दिवस संशोधन करून मगच या विषयांना हात घातला आहे. या २० लघुपटांमधून तीन सवरेत्कृष्ट लघुपटांची निवड करण्यात येणार आहे. हा महोत्सव मुंबई महापालिकेसमोरील प्रेस क्लब येथे ७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत होईल.