आशय आणि तंत्राच्या दृष्टीने लघुपटांचे महत्व दिवसेंदिवस वाढते आहे. कित्येक चांगले विषय, संकल्पना या लघुपटांमधून उत्तम आणि कलात्मकरित्या मांडल्या जाऊ लागल्या आहेत. लघपुट हे दिग्दर्शकासाठी खरोखरच प्रयोगशील माध्यम आहे हे गेल्या काही वर्षांत आलेल्या चांगल्या लघुपटांनी ठसवून दिले आहे. मात्र, व्यावसायिक सिनेमा लोकांपर्यंत जितक्या सहजतेने पोहोचतात तितक्या सहजतेने लघुपट पोहोचावेत यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्याचे कारण मुळातच लघुपटांची फारशी ओळखच प्रेक्षकांना करून देण्यात आलेली नाही. दि इंडियन एक्स्प्रेस आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला ‘एक्स्प्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट’ हे त्यादृष्टीने उचललेले पहिले पाऊल ठरले आहे. या पहिल्याच महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आणि वैविध्यपूर्ण विषयावंरील लघुपट पाहिल्यावर अगदी काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंतच्या या लघुपटांतून किती गोष्टी प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात, याचे प्रत्यंतर येते. या महोत्सवातील विजेते लघुपट आणि त्यांचे चित्रपटकर्मी यांचा हा धांडोळा..
सर्वोत्कृष्ट  लघुपट
(सामाजिक प्रश्न) – थेंबे थेंबे तळे साचे
दिग्दर्शक  – विशाल कुंभार
आमचा एक वेगळा ग्रुप आहे. आम्ही मालिका-चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो. आणि दुसरीकडे स्वत:चं असं काहीतरी करावं म्हणून सातत्याने विविध विषयावरचे लघुपट करत असतो. कित्येकदा आपण सगळे वेगवेगळ्या महोत्सवांसाठी किंवा लघुपटांच्या स्पर्धेत पुरस्कार मिळवण्यासाठी लघुपटांची निर्मिती करतो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या लघुपटाच्या बाबतीत मात्र आमचे तसे झाले नाही. समाजाची असलेली बांधिलकी आपण लघुपटाच्या माध्यमातून जपायची आणि त्यासाठी वेगळा विषय निवडायचा हेच आमच्या डोक्यात होतं. चर्चेतून पाण्याचा विषय निघाला. दुष्काळाविषयी फार बोलून झालं होतं, ऐकून झालं होतं पण, एक प्रश्न सारखा छळत होता तो म्हणजे मुंबईत बसून लोकांना खेडोपाडय़ातील दुष्काळाविषयी काय कळणार?  पण, जेव्हा प्रत्यक्ष त्या खेडय़ांमध्ये काय परिस्थिती आहे, याचे चित्रण लोकांपर्यंत येईल तेव्हा कुठेतरी त्याना आपण पाणी वाचवले पाहिजे याची जाणीव होईल, त्यामुळे आपली कलाकृती ही त्या ताकदीची पाहिजे, हाच विचार पक्का करून आम्ही लघुपटाच्या कामाला सुरूवात केली.
पाणी वाचवलं पाहिजे याबद्दल जनजागृती करणं वेगळं आणि एकीकडे धोधो वाया चाललेलं पाणी आणि दुसरीकडे तहानलेल्यांना प्यायला पाण्याचा थेंबही नाही ही परिस्थिती चित्रिकरण करताना आम्ही याचि देही, याचि डोळा अनुभवली. साताऱ्यातील एका गावात आम्ही चित्रिकरणासाठी जात होतो त्या गावात आठवडय़ातून केवळ दोनदा पाण्यासाठी टॅंकर येतो. आणि मग हेच पाणी ते पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरतात आणि अन्य गोष्टींसाठी वापरतात आणि त्याच गावाबाहेर झालेला मोठा सिमेंटचा रस्ता दररोज टॅंकरचे पाणी आणून भिजवला जातो. या अशा सगळ्या अनुभवाचे प्रतिबिंब आमच्या लघुपटातून उतरले आहे. या लघुपटाला आत्तापर्यंत दहा पुरस्कार मिळाले आहेत. पण, खरा आनंद आम्हाला तेव्हाच होतो जेव्हा लोक म्हणतात की तुमचा लघुपट पाहिल्यानंतर आम्ही रोज किती पाणी वाया घालवतो, याची जाणीव झाली. लोकांना ही जाणीव निर्माण करून देणं हाच आमचा या लघुपटामागचा उद्देश होता आणि तो साध्य झाला आहे.
सर्वोत्कृष्ट  लघुपट – खरा करोडपती  
दिग्दर्शक- पियूष ठाकूर
अमिताभ बच्चन आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा मी खूप चाहता होतो आणि आहे. त्यामुळे लघुपट बनविण्याचे ठरविल्यावर पहिल्यांदा करोडपती कार्यक्रम किंवा तत्सम कल्पनेवरच लघुपट बनवायचा असे मनात आले. नोव्हेंबर २०१० मध्ये कथा लिहायला घेतली तेव्हा एक गावातला सर्वसामान्य माणूस ‘केबीसी’मध्ये हरतो आणि गावात परत येतो असे कथानक घोळत होते. २०१० मध्ये ‘केबीसी’ लोकप्रिय झाले होते तरी मराठी करोडपती कार्यक्रम नव्हता. त्यामुळे पुण्याजवळच्या गावातील एक माणूस ‘केबीसी’मध्ये जातो आणि हरतो ही गोष्ट नावीन्यपूर्ण होती. हा माणूस ‘केबीसी’मध्ये हरल्यावर गावात येतो तेव्हा गावातील लोक त्याच्याशी नीट वागत नाहीत अशी मध्यवर्ती संकल्पना आणि त्याभोवती फिल्म असा विचार करत होतो. मग मी सिनेमाशी संबंधित नसलेल्या माझ्या दोन मित्रांशी चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले एक माणूस गेममध्ये पराभूत होऊन परत येतो यात वेगळं असं काहीच नाही. दरम्यानच्या काळात शेतकरी आत्महत्या, गावातील लोकांचे जीवन, त्यांचा भाबडेपणा, बाहेरच्या जगाविषयीची अनभिज्ञता, त्यामुळे त्यांची अंगभूत निरागसता, छोटय़ा गावात राहणाऱ्या लोकांचे जीवन महानगरीय जीवनशैलीसारखे खूप गुंतागुंतीचे नसते याची जाणीव झाली. म्हणून चर्चेतून असे ठरले की तो माणूस ‘केबीसी’मध्ये हरल्यानंतर परत येतो आणि निराश होतो तेव्हा सगळे गावकरी त्याचा आत्मविश्वास कसा परत आणतात, त्यासाठी काय काय क्लृप्ती लढवितात हे दाखविले तर लघुपट आशादायी वळणावर नेता येईल, भावनाशील होईल. मग माझ्या मित्रांनी संपूर्ण कथा लिहिली. ‘एफटीआयआय’ मध्ये शिकत असल्याने पुण्याजवळील गावांचा शोध घेतला आणि अखेर आमची डेडलाईन जवळ आल्यावर आम्हाला नारायणपूरजवळ देवडी नावाचे गाव सापडले. विशेष म्हणजे तिथे खूप लोकांकडे टीव्ही नव्हता. त्यांना फक्त अमिताभ बच्चन माहीत होता, पण, ‘केबीसी’विषयी फारसे काहीच माहीत नव्हते. त्यामुळे लघुपट बनवायला २०० गावकऱ्यांची अनभिज्ञता, निरागसता याचा खूप उपयोग झाला. गंमत म्हणजे आमच्याकडे दोन दिवस होते आणि रात्री वीज गेल्यावर गावकरी बाहेरच येईनात, मग आम्ही मित्रांनी मिळून अमिताभच्या आवाजाची मिमिक्री केली, खूप गाणी वाजवली, त्यांचे मनोरंजन केले. आणि मग लोक आमच्यात सामील झाले आणि एक चांगला लघुपट आम्ही बनवू शकलो. जगभरातील जवळपास ३५ लघुपट महोत्सवांमध्ये हा लघुपट दाखविला असून तेथील स्थानिक टीव्हीवरचे ‘केबीसी’चे कार्यक्रम लोकप्रिय असल्यामुळे आमच्या लघुपटाच्या कथानकाशी सर्व ठिकाणचे प्रेक्षक स्वत:ला जोडून घेऊ शकले असे जाणवले.
सर्वोत्कृष्ट  संकलन – फेस लिफ्ट
संकलक – अमेय गोरे  
‘फेस लिफ्ट’ या लघुपटाची संकल्पना दिग्दर्शक विशाल मोरेची होती. बंद पडलेल्या गिरण्या आणि त्यामागे दडलेला मुंबईतील गिरणगावचा इतिहास. हे कुणाला माहित नाही असे नाही. पण, त्याची परिणामकारकता एक वेगळ्या प्रकारे जाणवून देण्याचा प्रयत्न या लघुपटातून केला. आणि मला आनंद आहे की नेमक्या त्याच प्रयत्नांचे कौतूक झाले. दिग्दर्शक, कलाकार, निर्माते ही मंडळी नेहमीच दिसतात पण, कोणताही चित्रपट उत्उत्तम होण्यासाठी त्याचे संकलन उत्कृष्ट असावे लागते, हे बऱ्याचदा लोकांना माहित नसते त्यामुळे त्याची दखलही घेतली जात नाही. ‘फेस लिफ्ट’ मध्ये या बंद पडलेल्या गिरण्यांमागे दडलेली सामाजिक अस्वस्थता दाखवताना यंत्रमागांचा आवाज, कापूस त्यातून निघणारा धागा आणि सरतेशेवटी ज्या यंत्रातून निघालेला कापूस आणि त्यापासून कापड विणले जात होते आज त्याच गोल गोल फिरणाऱ्या यंत्रातून बाहेर पडतोय तो ‘बुढ्ढी के बाल’ सारखा खाण्याचा पदार्थ आणि तो विकला जातोय याच गिरणगावच्या जमिनींवर उभ्या राहिलेल्या मॉलमध्ये.. ही संकल्पना विकसित झाल्यानंतर ती कथेतून मांडण्यापेक्षा बंद पडलेल्या यंत्रमागांची दृश्ये आणि आवाज यांच्या सहाय्याने मांडायची हे निश्चित केले. आम्हाला चित्रिकरणासाठी जी जागा मिळाली होती त्या जागेतच इतके नाटय़, इतकी खोली दडलेली होती की त्याचाच वापर परिणामकारकतेसाठी करून घ्यायचा असे ठरवले. ‘फेस लिफ्ट’ ही त्याच दृश्य-आवाज आणि त्याला असलेला एक ताल या माध्यमातून बोलकी झाली आहे. या आमच्या प्रयत्नाला दाद मिळाल्याबद्दल नक्कीच आनंद वाटतो आहे. संकलनाची प्रक्रिया ही इतकी महत्त्वाची असते, याची जाणीव नाही. अशा परिस्थितीत ‘एक्स्प्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट’मध्येही संकलनासाठी पुरस्कार निश्चित केले नव्हते पण, ऐनवेळी बदल करून संकलनासाठीही पुरस्कार दिला गेला, दखल घेतली गेली याचे समाधान वाटते. मी सध्या एफ टीआयआयमध्ये दिग्दर्शनाचे धडे घेतो आहे. पण, एक उत्कृष्ट दिग्दर्शक एक उत्कृष्ट संकलक असावा लागतो, हे मला माहित असल्याने त्यावर मेहनत घेतो आहे. ‘फेस लिफ्ट’साठी संकलनाचा पुरस्कार मिळाल्याने आत्मविश्वासही दुणावला आहे.

सर्वोत्कृष्ट लघुपट
(माहितीपट) – ‘जी फॉर डुडल’
दिग्दर्शक – मृण्मयी के.
दररोज इंटरनेट  सुरू केल्यावर गुगलचे होमपेज आपण सगळेचजण नित्यनेमाने पाहतो. तेव्हा गूगल सर्चमध्ये जाऊन काही शब्द टाईप करण्यापूर्वी आपले लक्ष वेधून घेते ‘गुगल डुडल’ अर्थात गूगल सर्च बारच्या वरती दिसणारी आडवी पट्टी. कधी एखाद्या वैज्ञानिकाच्या जन्मदिनी त्याने लावलेल्या शोधांची चित्रमय पट्टी तर कधी सत्यजित राय यांच्या ‘अपू’त्रयीला ५० वर्षे झाल्यानिमित्त त्यांची महती सांगणारी पट्टी. खरेतर प्रत्येकालाच आज काय नवीन डुडल असणार याची उत्सुकता असते. परंतु, मला त्या पलिकडे जाऊन उत्सुकता निर्माण झाली होती ती म्हणजे ‘गुगल डुडल’वर आज काय टाकायचे याचा विचार करणाऱ्या लोकांची, ते कसे काम करत असतील, रोजच्या रोज आकर्षक पद्धतीने सादरीकरण कसे करत असावेत याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. केंब्रिज विद्यापीठात चित्रपट विषयक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यावर साधारण एक-सव्वा वर्षांपूर्वी छोटी फिल्म बनविण्याची ‘असाइनमेंट’ मिळाली. तेव्हा विचार केला आपले कुतूहल शमविण्याबरोबरच गुगलच्या अवाढव्य व्यापात ‘गुगल डुडल’ बनविणाऱ्या टीमलाच आपल्या फिल्ममधून सादर केले तर माझ्यासारख्याच लाखो लोकांचे कुतूहल शमविता येईल. ‘गुगल डुडल’च्या स्वतंत्र टीम देशोदेशी असतात. भारतातही वेगळी टीम आहे असे समजले. सुरुवातीला फक्त चित्र ‘गुगल डुडल’च्या पट्टीवर दिसायची. परंतु, नंतर ‘इंटरॅक्टिव्ह’ पद्धतीचे गुगल डुडल्स दिसू लागले. आणखी एक गंमत म्हणजे ‘गुगल डुडल’च्या स्पर्धाही असतात. आपणही त्या स्पर्धेत सहभागी झालो आणि आपण केलेले डुडल आवडले तर तेसुद्धा वापरले जाते. मला ‘जी फॉर डुडल’ हा लघुपट विद्यापीठातील अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बनवायचा होता. त्यामुळे गुगल डूडलच्या मुख्य कार्यालयात अमेरिकेत जाणे शक्य नव्हते. म्हणून मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडून खूपसे साहित्य, रेखाटने, चित्रे मागवून लघुपट तयार केला आहे. अनेकांशी ईमेलद्वारे संपर्क साधून, प्रश्न विचारून आवश्यक ती पटकथा तयार केली. खरे तर गुगल डुडलचे काम कसे चालते हे लघुपटाद्वारे सगळ्यांसमोर आणणे मला आवडले असते. परंतु, विद्यापीठ सोडून जाणे शक्य नव्हते. म्हणून गुगल डुडलसाठी काम करणाऱ्या टीममधील लोकांच्या मुलाखती न दाखविता त्यांनी पुरविलेल्या साहित्याच्या आधारेच लघुपट बनविणे भाग पडले.