News Flash

पृथ्वीराजबाबांनी दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पुसली पाने

जिल्ह्य़ातील भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईवर ठोस तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंगळवारची बुलढाणा जिल्ह्य़ाची हवाई सफर वांझोटी ठरली. औपचारिकता व जिल्ह्य़ातील कॉंग्रेस नेत्यांच्या

| February 14, 2013 01:25 am

मुख्यमंत्र्यांचा बुलढाणा जिल्हा दौरा वांझोटा
जिल्ह्य़ातील भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईवर ठोस तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंगळवारची बुलढाणा जिल्ह्य़ाची हवाई सफर वांझोटी ठरली. औपचारिकता व जिल्ह्य़ातील कॉंग्रेस नेत्यांच्या भोजनावळी व गळाभेटी व्यतिरिक्त या भेटीला फारसा अर्थ नव्हता. दौऱ्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला. हा बडेजाव व खर्च जनतेसाठी अर्थहीन होता. राजा आला, उदार होण्याचे सोंग केले आणि जिल्ह्य़ाच्या हातावर तुरी देऊन गेला, असे या दौऱ्याचे वर्णन केले जात आहे.
या जिल्ह्य़ात पाऊस अवर्षणामुळे भीषण दुष्काळाचे सावट आहे. सुमारे १०५० खेडय़ात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांपेक्षा या जिल्ह्य़ाची परिस्थिती वाईट आहे. दुष्काळाच्या व आर्थिक अडचणींच्या झळा बसलेले शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. ही वस्तुस्थिती खुद्द मुख्यमंत्र्यांना मान्य आहे, मात्र त्यांच्या अखत्यारीतील जिल्हा प्रशासनाला मात्र ही बाब मान्य नाही. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्यात जिल्ह्य़ाच्या दुष्काळ व पाणीटंचाईसंदर्भात नियोजन व उपाययोजनांचा अजिबात समन्वय नाही, ही बाब कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. मुख्यमंत्री येतील, जिल्ह्य़ासाठी काही तरी ठोस देतील, रोजगार हमी योजनेसाठी नियम व अटी शिथिल करून आपल्या विशेष अधिकारात मजुरीचे दर वाढवून किमान शंभर क ोटी, पाणीटंचाईसाठी किमान पन्नास क ोटी, शेतकरी कर्जमाफी व मदतीसाठी भरीव निधी देतील, अशी अपेक्षा होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी ना यापैकी कुठली घोषणा केली ना कुठलाही धोरणात्मक निर्णय जाहीर केला. केवळ आढावा बैठकीची औपचारिकता पार पाडली.
या बैठकीत नियोजन व उपाययोजनांच्या संदर्भात सुरू असलेला जिल्हा प्रशासनाचा गलथानपणा मात्र त्यांच्या निदर्शनास आला. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या खासदार-आमदारांशी संवाद साधतांना दुष्काळासह जिल्हा प्रशासनाचा निष्क्रीय कारभार त्यांना मान्य करावा लागला.
मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यात जाहीर केलेल्या निर्धारित कार्यक्रमाचा डेकोरमही पाळला नाही. ते येथे एक वाजता येणार होते. आले चार वाजता. आढावा बैठकीनंतर ते जिल्ह्य़ातील शिष्टमंडळांची विश्राम भवनावर निवेदने स्वीकारणार होते, मात्र त्यांनी विश्राम भवनाचे तोंडही पाहिले नाही. मात्र हवाई सफरीनंतर आल्या आल्या त्यांनी जिल्हा कॉंग्रेसचे लाडके अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या निवासस्थानी जाऊन दुष्काळातील पंचपक्वानी भोजनाचा वनमंत्री पतंगराव कदम व आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्यासोबत आस्वाद घेतला. त्यांनी विजय अंभोरे यांना आतापर्यंतचा सर्वात यशस्वी अध्यक्ष म्हणून शाबासकी दिली. वासनिकांना हिऱ्यांची पारख असल्याचे ते म्हणाले. जणू बुलढाणा जिल्ह्य़ाच्या राजकीय दुष्काळात हा हिरा अधिक चमकतो, असे त्यांना म्हणायचे होते.
हे क ौतूक ऐकून कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना आभाळही ठेंगणे वाटले असावे. जिल्ह्य़ातील कॉंग्रेसवाल्यांनी मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे  गांभीर्य समजू दिले नाही. दुष्काळातही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे लाखो रुपयांचे बॅनर्स व जाहिीराती झळकत होत्या.
हा सगळा प्रकार म्हणजेच दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार होता. तरी देखील कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी झाल्याचा दावा करीत आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 1:25 am

Web Title: short help from cm fail visit by cm
टॅग : Congress,Famine
Next Stories
1 ‘तृप्ती’च्या चंदा वानखडे यांना जिल्हा उद्योग पुरस्कार
2 ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या तयारीचा मुख्यमंत्र्यांकडून विस्तृत आढावा
3 विदर्भ वैधानिक विकास मंडळाला अंधारात ठेवल्याने तीव्र नाराजी
Just Now!
X