जिल्ह्यात अन्न धान्य आणि विविध फळफळावांच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी तुलनेत प्रक्रिया उद्योगांची संख्या अतिशय कमी असल्याने जिल्ह्यातील युवा उद्योजकांना प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी चांगली संधी आहे. विशेष म्हणजे केवळ नाशिकच नव्हे तर, शेजारील धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनाही याचा लाभ होऊ शकेल, असा आशावाद दोन्ही जिल्ह्यातील उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच व्यापाऱ्यांकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.
मागील एक वर्षांपासून कांदा आणि काही महिन्यांपासून बाजारपेठांमध्ये डाळिंबाचे भाव घसरले आहेत. कांद्याच्या निर्यात धोरणासंदर्भात होणारी धरसोडवृत्ती आणि डाळिंबाचे एकाचवेळी मोठय़ा प्रमाणावर झालेले उत्पादन, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव ही कारणे त्यासाठी देण्यात येत असली तरी ही तत्कालिन कारणे असल्याचे सटाणा तालुक्यातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्यास कोणत्याही पिकाचे भरमसाठ उत्पादन आणि परिस्थिती प्रतिकूल असल्यास कमी उत्पादन हे गणित सर्वानाच माहीत आहे. अशा अनुकूल-प्रतिकूलतेच्या घेऱ्यात शेतकरी वर्ग अडकला असल्याचे मत दीपक चौधरी या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. धुळे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून औद्योगिक विकासाकडे गंभीरपणे लक्ष देण्यात येत असले तरी, त्यात कृषिपूरक उद्योगांची संख्या अतिशय मर्यादित आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. या दोन्ही जिल्ह्यांमधील परिस्थिती बदलण्यासाठी कृषिपूरक प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगांची संख्या वाढविण्यासाठी युवा उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ होत नसल्याने हा प्रश्न अधांतरी आहे.
यंदा कांदा आणि डाळिंब यांचे उत्पादन आणि भावाची समस्या कधी नव्हे ती इतकी शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे. जिल्ह्यात डाळिंबावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या समाधानकारक असती तर, डाळिंबाचे कितीही भरघोस उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळणे शक्य झाले असते, असेही चौधरी यांनी नमूद केले आहे. एकिकडे नोकऱ्यांची संख्या मर्यादित असताना युवकांना प्रक्रियाउद्योगांच्या उभारणीसाठी योग्य प्रकारे सहकार्य केल्यास बेरोजगारांना कामही मिळू शकते, असा दावाही त्यांनी केला आहे.