मुंबई, मढ येथील कोळी व्यावसायिकांची अडचण
कुटुंबाचा झालेला विस्तार, प्रत्येकाने स्वतंत्रपणे सुरू केलेला मच्छीमारीचा व्यवसाय, मासळी वाळविण्यासाठी अपुरी पडू लागलेली जागा आणि त्यामुळे रोजगारावर होऊ लागलेला परिणाम आदी कारणांमुळे मुंबईचे मूळ नागरिक असलेले कोळी बांधव हैराण झाले आहेत. मासळी सुकवून त्यावर आपल्या कुटुंबाची गुजरण करणाऱ्या मच्छीमारांना वाळवणासाठी जागा उपलब्ध करावी, असे गाऱ्हाणे मच्छीमार संघटनांनी सरकारदरबारी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मढ किनाऱ्यावर सुकटाचे अतिक्रमण’ हे वृत्त ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे वाळवणासाठीच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला. मढ किनाऱ्यालगत मच्छीमारांची मोठी वसाहत असून अनेक कुटुंबे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या कुटुंबांतील मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या सदस्यांची संख्या वाढली आहे. एकाच कुटुंबातील तीन-चार जण मासेमारी करून मासळी वाळविण्यासाठी किनाऱ्यावर पोहोचत आहेत; पण मासळी वाळविण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे मासळी वाळवायची कुठे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. परिणामी नाइलाजाने मढ किनाऱ्यावर प्लास्टिक अंथरून त्यावर मासळी वाळवावी लागत आहे, असे मढ मच्छीमार सवरेदय सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुकवलेल्या मासळीला मोठी मागणी आहे. अनेक चोखंदळ मांसाहारी चवीने त्यावर ताव मारतात. तसेच कुक्कुटपालनासाठीही सुक्या मासळीचा वापर केला जातो; पण मासळी वाळविण्यासाठी जागाच मिळाली नाही, तर मांसाहारींना आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांना ती मिळणार कशी? तसेच जागेअभावी मच्छीमारांवरही बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
मच्छीमारांच्या वसाहतीलगतच्या किनारपट्टीवर मासळी वाळविण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. मात्र मढ किनाऱ्यावर पर्यटकांनाही मोकळा श्वास घेता यावा आणि मच्छीमारांचाही रोजगार बुडू नये यासाठी सरकारनेच वाळवणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. म्हणजे बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळून मच्छीमारांच्या संसाराचे गाडे अडणार नाही, अशी मागणी मढ मच्छीमार सवरेदय सहकारी सोसायटीकडून करण्यात
आली आहे.