सिंहस्थ कुंभमेळ्यात कित्येक लाख भाविक शहरात येणार असून त्यामुळे कुंभमेळ्यात पाणी व विजेची मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होण्याची भीती ज्येष्ठ  समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केली आहे.
कुंभमेळा ऐन पावसाळ्यात सुरू होत आहे. नाशिक शहर व परिसरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या पुरेसा जलसाठा असला तरी वेळेवर पावसाळ्यास सुरुवात न झाल्यास हा जलसाठा येणाऱ्या भाविकांसाठी कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच उष्णतेच्या प्रखरतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन आणि भूगर्भातील पाण्याची वाढलेली खोली या कारणांनी पाणीसाठय़ाच्या प्रमाणात घट होऊ शकते. अशा स्थितीत पाण्याची मागणी व मोठय़ा प्रमाणात होणारा वापर यामुळे टंचाई निर्माण होऊ शकेल. याव्यतिरिक्त कमी वीज उत्पादन आणि वाढती मागणी यांमुळे वीजपुरवठय़ात अडथळा येऊ शकेल. या दोन्ही मूलभूत सुविधा न मिळाल्यास भाविकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकेल, अशी वास्तवता करंजकर यांनी निदर्शनास आणली आहे. अलीकडे निरनिराळ्या घटनांमुळे व्यक्तींमधील सहनशीलता कमी झाली आहे. छोटय़ा व किरकोळ कारणांमुळे वादाच्या घटना वारंवार निर्माण होताना दिसतात. हे वास्तव लक्षात घेऊन कुंभमेळ्यात असे प्रसंग घडू नयेत याची दक्षता घेण्याची गरज करंजकर यांनी व्यक्त केली आहे.