जिल्ह्य़ात गॅस एजन्सीकडे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन दिवसात मिळणाऱ्या सिलिंडरसाठी ग्राहकांना वीस ते पंचवीस दिवस वाट पाहावी लागत आहे. एकीकडे वेळेवर सिलिंडर मिळत नाही तर दुसरीकडे रॉकेलसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
‘एलपीजी’चा वापर अधिक होत असला तरी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत रॉकेलचे स्थान अढळच आहे. सिलिंडरचा तुटवडा आणि दर वाढल्यामुळे नागरिकांच्या घरात स्टोव्ह कायमच आहेत. महालक्ष्मी आणि गणपती उत्सवानंतरही गेल्या पाच सहा दिवसांपासून अनेक एजन्सीकडे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी आता पंधरा ते वीस दिवस वाट पाहावी लागत आहे. स्टोव्हशिवाय आज नागरिकांना पर्याय नाही आणि त्यामुळे रॉकेलची गरज आजही कायमच आहे. झोपडट्टय़ांमध्ये  अनेकांच्या घरी सिलिंडर असले तरी त्यांना आज रॉकेलशिवाय पर्याय नाही. रॉकेलसाठी त्यांना शहरात पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.   
गेल्या काही दिवसात जिल्ह्य़ात आणि शहरातही काही ठिकाणी रॉकेलचा काळाबाजार वाढत आहे. महागाईमुळे सामान्य नागरिक आता अधिकच होरपळले जात आहेत. शासनाकडून अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत रेशन कार्डाच्या आधारे नागरिकांना निळ्या रंगाचे रॉकेल दिले जात आहे. उपलब्ध साठय़ानुसार दारिद्रय़ रेषेखाली, ज्येष्ठ व निराधार नागरिक तसेच दारिद्रय़ रेषेवरील नागरिकांना वेगवेगळ्या प्रमाणात रॉकेलचे प्रमाण शासनाने ठरवून दिले आहे. प्रत्येक रेशन दुकानापुढे रॉकेलची गाडी जाते आणि कार्डधारकांना रॉकेल दिले जाते. प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत रॉकेल पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. मिळालेच तर शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी कमी दिले जाते. नागरिकांच्या नावे असलेले रॉकेल प्रत्यक्षात रॉकेल माफियांच्या हाती गेले असल्यामुळे नागरिकांना ते मिळत नाही आणि मिळालेच ते आहे त्या भावापेक्षा दुप्पट भावाने विक्री जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहरात अजनी, सक्करदरा, पाचपावली, जरीपटका, खापरी, वाडी, मानकापूर, पारडी, कळमना, रामेश्वरी या सर्वच वस्त्यात विशेषत: रिंग रोड, महामार्गावरील वस्त्यांमध्ये रॉकेल विक्रेते आहेत मात्र, त्या ठिकाणी काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. रॉकेल केवळ वाहनातच नव्हे तर विविध उद्योगांमध्येही वापरले जाते. उत्पादनांसाठी आवश्यक इंधनापेक्षा हे रॉकेल स्वस्त पडते. अशा उद्योगांना रॉकेल बडे माफिया पुरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रॉकेलचा तुटवडा नाही – बनसोड..शहरात सध्या रॉकेलचा तुटवडा नसून प्रत्येक रेशन दुकानातून रॉकेलचा पुरवठा केला जात आहे. रेशन दुकानातून ग्राहकांना त्यांच्या रेशन कार्डानुसार रॉकेलचे वाटप केले जात आहे. ज्यांच्याकडे दोनपेक्षा अधिक सिलिंडर आहे, त्यांना २ ते ३ लिटर प्रमाणे रॉकेल दिले जात आहे. ज्या नागरिकांना रॉकेल मिळत नाही किंवा जास्तीचे पैसै आकारून जर रॉकेलची विक्री केली जात असेल अशा विक्रेत्याविरुद्ध नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे अन्न नागरी पुरवठा विभागाचे शहर पुरवठा अधिकारी बनसोड यांनी सांगितले.