सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकनगरीत दाखल होणाऱ्या देश-विदेशातील लाखो भाविकांच्या निवासव्यवस्थेच्या प्रश्नाची तड प्रशासन नेमकी कशी लावणार, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. सद्य:स्थितीत शहरातील विविध हॉटेल्समध्ये सुमारे २० हजार खोल्या असून तिथे जास्तीत जास्त एक ते दीड लाख भाविक वास्तव्य करू शकतील. धर्मशाळा व इतर लहान-मोठय़ा व्यवस्थांचा विचार केल्यास आणखी लाखभर जणांची कशीबशी व्यवस्था होईल. शाही पर्वणीच्या दिवशी दाखल होणाऱ्या भाविकांच्या अफाट संख्येचा विचार करता ही व्यवस्था तोकडीच पडण्याचा धोका आहे. साधू-महंतांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या साधुग्रामच्या जागेचा विषय अद्याप अधांतरी असताना भाविकांच्या निवासव्यवस्थेचा प्रश्न प्रशासनासमोरील डोकेदुखी ठरणार आहे.
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने वेग पकडला असून शासकीय यंत्रणा विविध कामांना चालना देत आहे. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडणे हेच शासन व प्रशासनासमोरील मुख्य आव्हान आहे. कुंभमेळ्यात विविध आखाडय़ांचे साधू-महंत वर्षभरासाठी नाशिकनगरीत दाखल होतात, त्याचप्रमाणे शाही स्नानाचा अपूर्व योग साधण्यासाठी लाखो भाविकही येतात. मागील सिंहस्थात शाही पर्वणीच्या दिवशी भाविकांचा आकडा तब्बल ५० लाखांच्या घरात गेला होता. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, त्यांची निवास व वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर गांभीर्यपूर्वक नियोजन करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने काही अंशी तयारी सुरू असली तरी लाखो भाविकांच्या निवासव्यवस्थेचा प्रश्न कसा सोडविता येईल, यावर गांभीर्याने विचार झालेला नाही.
सिंहस्थात येणारे भाविक शहरातील धार्मिक स्थळांसह आसपासच्या सप्तशृंग गड, शिर्डी, इगतपुरीतील कावनई आदी धार्मिक स्थळांना भेटी देतील. यामुळे बहुतेकांचा कल नाशिक व परिसरात मुक्कामी राहण्याकडे असेल. या परिस्थितीत भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता त्यांच्या निवासाची काय व्यवस्था असेल, याचे नियोजन झाले नसल्याचे दिसते.
कुंभमेळ्यातील एका बैठकीदरम्यान भाविकांच्या निवासव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने महापालिका हद्दीबाहेर थांबविली जाणार आहेत. त्या ठिकाणावरून भाविकांची शहरात ने-आण करण्याची धुरा एसटी बसेस सांभाळणार आहेत. बाहेरून येणाऱ्या भाविकांची वाहने शहराबाहेर ज्या ठिकाणी थांबविली जातील, तिथेच आसपासच्या मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात तंबू उभारून निवासव्यवस्था करण्याचा पर्याय पोलीस यंत्रणेने सुचविला आहे. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर महापालिका हद्दीलगत व बाहेर भाविकांच्या वाहनांसाठी १९ वाहनतळ उभारले जाणार आहेत. त्याच परिसरात तात्पुरती निवासव्यवस्था झाल्यास या प्रश्नावर काही अंशी तोडगा निघू शकतो; परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
तात्पुरत्या स्वरूपात शहरात निवासासाठी असणाऱ्या हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा व तत्सम व्यवस्थांची क्षमता लक्षात घेतल्यास त्यामध्ये अधिकतम अडीच लाख भाविकांची व्यवस्था होऊ शकते. गतवेळी सिंहस्थ काळात दाखल झालेल्या भाविकांची संख्या पाहिल्यास उर्वरित भाविक कुठे जाणार, हा प्रश्न उपस्थित होतो.
‘एमटीडीसी’च्या योजनेसाठी केवळ ५५ जणांची तयारी
सिंहस्थ काळात निवासव्यवस्थेच्या प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने शहरवासीयांनी आपल्या घरात भाविकांसाठी निवास व न्याहरी योजना राबवावी याकरिता पुढाकार घेतला आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५५ नागरिकांनी ही योजना राबविण्याची तयारी दर्शवत तशी नोंदणी केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये या धर्तीवर आधीपासून निवासव्यवस्था केली जाते. तिथे वर्षभर विविध धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांचा राबता असतो. ज्या पंडितांकडून विधी केले जातात, त्यांच्या घरात भाविकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. नाशिक शहरातील व आसपासच्या भागातील नागरिकांनी सिंहस्थ काळात निवास व न्याहरी योजना राबवावी याकरिता महामंडळ प्रयत्नशील असल्याचे ‘एमटीडीसी’च्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी सांगितले. नाशिक शहराबरोबर वणी, कावनई, इगतपुरी आदी भागांतील नागरिकांनी ही योजना राबवावी याकरिता प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून स्थानिकांना उत्पन्नाचे साधन मिळेल, शिवाय भाविकांच्या निवास व भोजनव्यवस्थेचा प्रश्न काही अंशी सोडविता येईल. परंतु या पद्धतीने लाखो भाविकांच्या निवासव्यवस्थेचा प्रश्न सोडविता येईल काय, हा प्रश्न आहे.