‘क्लोरोक्विन’ही नाही !
सध्या हिवतापासारख्या आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने दिसून येत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ‘क्लोरोक्विन’ सारखे औषधे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांना आवश्यक असणाऱ्या ‘फॉलिक अ‍ॅसिड’च्या गोळ्याही नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. औषधेच मिळत नसतील तर मेडिकलमध्ये येऊन फायदा काय, असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे.
मेडिकलच्या औषधी विभागात सध्या सोळा प्रकारची औषधे नाहीत. यामध्ये अ‍ॅमोक्सीसिलीन २५० एमजी, मेट्रोनीडाझोल २०० व ४०० एमजी, क्लोबाझाम ५ एमजी, अ‍ॅमिट्रीप्लीलाईन १० एमजी, टॅब-क्लोर्फेनिरामाईन मेलिएट ४ एमजी, इम्प्रामाईन २५ एमजी, अ‍ॅमीनोफिलीन १०० एमजी,  बी कॉम्प्लेक्स, डायझेपाम ५ एमजी, प्रेडनीसोलोन ५ एमजी, फॉलिक अ‍ॅसिड ५ एमजी, क्लोरोक्विन २५० एमजी, कार्बिनाझोल ५ एमजी, थायरोक्साईन ५० एमजी, फॉलिक अ‍ॅसिड प्लस फेरस सल्फेट आणि सायरप-पोटॅशियम क्लोराईड यांचा समावेश आहे. मेडिकलमधील बाह्य़रुग्ण विभागात दररोज दोन हजार नवे व जुने रुग्ण तपासणी व उपचारासाठी येत असतात. अशा रुग्णांना औषध विभागातूनच औषधी घेण्यास सांगितले जाते. परंतु सोळा औषधे नसल्याने ही औषधे लागणाऱ्या रुग्णांना बाहेरून खरेदी करावी लागत आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
पुरवठादारांनी औषधांचा पुरवठा थांबवल्यामुळे मेडिकलमध्ये औषधांची टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मेडिकलमध्ये औषधांचा पुरवठा केल्यानंतर संबंधित बिले मंजुरीसाठी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात पाठवले जाते. यानंतरच त्याला मंजुरी मिळते. ही प्रक्रिया फारच किचकट आहे. पहिल्या बिलांना मंजुरी मिळेपर्यंत पुरवठा केलेल्या काही औषधांचा साठा संपून जातो. जवळपास औषध पुरवठादारांची ५० लाखांच्या वर बिले थकित असल्याचे वृत्त आहे. परंतु याबाबतीत कुणीही स्पष्टपणे माहिती देण्यास तयार नाहीत.

‘स्थानिक पातळीवर खरेदी करू’
मेडिकलमध्ये काही औषधी संपल्याने ती स्थानिक पातळीवर खरेदी करून रुग्णांना दिली जाईल. मेडिकलच्या अधिष्ठात्यांना ५० लाखापर्यंतची खरेदी करण्याचे अधिकार राज्य शासनाने दिले असले तरी तसा अध्यादेश निघाला नाही. तरीही काही प्रमाणात औषधी खरेदी केली जाईल. मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मुंबई संचालनालयाशी संपर्क साधून तोडगा काढण्याची विनंती केली जाईल.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी. हेडाऊ