25 May 2020

News Flash

शोभायात्रेतून उमटला राष्ट्रप्रेमाचा झंकार

ढोल ताशांचा गजर.. लेझीम कवायत.. मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती.. पेशवाईच्या थाटात सहभागी झालेले विद्यार्थी.. सोबतीला घोडेस्वारांसह भालदार व चोपदार.. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत करणारे आकर्षक

| March 16, 2013 12:27 pm

ढोल ताशांचा गजर.. लेझीम कवायत.. मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती.. पेशवाईच्या थाटात सहभागी झालेले विद्यार्थी..  सोबतीला घोडेस्वारांसह भालदार व चोपदार.. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत करणारे आकर्षक चित्ररथ.. सावरकरांच्या साहित्याचे दर्शन घडविणारी ग्रंथ पालखी..
ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्या वतीने येथे आयोजित रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेचा हा सर्व लवाजमा. भर दुपारी अभिनव भारत संस्थेपासून सुरू झालेल्या या नेत्रदीपक शोभायात्रेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रा व ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाठक, अभिनेता शरद पोंक्षे, ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते, सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले, अभिनव भारत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विनायकदादा पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सावरकरांच्या साहित्यांचे समग्र दर्शन घडविणारी पालखी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. ‘नाशिक ढोल’चा निनाद आणि राष्ट्रभक्तीपर गितांनी वातावरण भारावले होते. यात्रेत शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पथकाने समईची ज्योत कसरतींव्दारे साकारली. यशवंत व्यायामशाळेच्यावतीने मल्लखांबच्या कसरती करण्यात आल्या. त्यात अगदी तीन वर्षांच्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत व्यायामपटू सहभागी झाले होते. सावरकर जलतरण तलाव, सीडीओ मेरी, भोसला सैनिकी विद्यालय, गोदावरी फाऊंडेशन संचलित अध्यापक विद्यालय, धन्वंतरी नर्सिग महाविद्यालय, गोखले एज्युकेशन सोसायटी आदी शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. भगवा हातात घेत आदिवासी पथकाने केलेले नृत्य सर्वाची दाद घेऊन गेले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि सावरकर यांच्या वेषभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमुळेही यात्रेची शोभा अधिकच वाढली.
पेशवाई ग्रुपचे घोडेस्वार अनोख्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली. वंदे मातरम्, भारत माता  की जय आदी घोषणांनी यात्रामार्ग दुमदूमून गेला. अभिनव भारतपासून निघालेली ही शोभायात्रा मेनरोड, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, गंगापूररोडमार्गे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरीत पोहोचली. संमेलनस्थळी यात्रेचा समारोप झाला.

स्वतंत्रता स्तोत्राचे विक्रमी समूहगान
सावरकरांच्या जन्मभूमीत प्रथमच ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या स्वतंत्रता स्तोत्राचे ३४४ शाळांमधील एक लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी समूहगान करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. केवळ शालेय विद्यार्थीच नव्हे तर, शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅक, लायन्स क्लब अशा विविध ठिकाणी शुक्रवारची सकाळ या कवितेने पूर्णपणे भारल्याचे पहावयास मिळाले. लाखो विद्यार्थी व शेकडो नागरिकांनी समूह गायनात सहभागी होऊन सावरकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ४४३ हून अधिक शाळा व अनेक सामाजिक संस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. समूह गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाखहून अधिक होती. तसेच शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांनी या कवितेचे सामूहिक गायन केले. लायन्स क्लबसारख्या अनेक संस्थांनी हा उपक्रम स्वयंस्फुर्तीने राबविल्याचे बोरस्ते यांनी नमूद केले. या उपक्रमाची शाळांनी जय्यत तयारी केली होती. पाच ते सहा दिवस आधीपासून त्याची रंगीत तालीम घेण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ ही कविता लिहिली. १९०३ मध्ये पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयात शिकत असताना सावरकरांनी रचलेले हे अप्रतिम गाणे ‘स्वातंत्र्याचे स्तोत्र’ म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात अजरामर आहे. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी स्वातंत्रता स्तोत्राचे विक्रमी समूहगायन यशस्वीपणे पार पडले. सकाळी साडे आठ वाजता ‘रेड एफएम’ वरूनही हे गीत प्रसारित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2013 12:27 pm

Web Title: show of nationalism in grace rally
Next Stories
1 रेल्वेतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ७२ रणरागिणी सज्ज
2 तंटामुक्त पात्रतेसाठी धडपड
3 नाशिकमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ
Just Now!
X