आपल्याकडच्या सर्व सण आणि उत्सवांची प्रेरणा निसर्गाशी निगडित असते. गणेशोत्सवही त्यास अपवाद नाही. सेंद्रीय शेतीसाठी नुकताच राज्यस्तरीय कोकण विभागीय पुरस्कार मिळालेले बदलापूरजवळील बेंडशीळ येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र भट गेली सात वर्षे निसर्ग गणेशाचे पूजन करीत आहेत. मध आणि तुपामुळे मातीत जिवाणूंची निर्मिती होऊन जमीन सुपीक होते म्हणून गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करताना त्याला पंचामृताचा अभिषेक सांगण्यात आला आहे. राजेंद्र भट त्या विचारांनुसार माघ महिन्यात गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि दीड दिवसानंतर आपल्याच शेतात ते विसर्जित करून जमिनीचा कस वाढवतात.