तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शुभम रावसाहेब शिंदे हा विद्यार्थी आय आय टी (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) परीक्षेत अनुसूचित जाती जमाती वर्गातून देशांत ४६ वा आला आहे. शुभमला आता एरोस्पेसमध्ये बी. टेक. करायचे आहे.
शुभम शिंदे या विद्यार्थ्यांचे शिक्षण संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल सहजानंद नगर, संत तुकाराम विद्यालय पुणे येथे झाले. त्याने या आधी प्रज्ञाशोध परीक्षेत देशांत १५६ वा क्रमांक, बारावी परीक्षेत ९२ टक्के गुण, जे ई ई परीक्षेत २१५ गुण, जे ई अॅडव्हान्स परीक्षेत १८१ गुण मिळविले आहेत. केंद्रशासनाच्या किशोरवयीन वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेत ४९ वा येण्याचा मानही मिळवला आहे. शुभमला वाचन, गायन, चित्रकलेची आवड आहे. त्याने शंभराच्या वर कविता लिहिल्या असून ४ थीमध्ये असतांना त्याची कविता अखिल भारतीय पातळीवर दुसरी आली होती. त्याने दररोज ३ ते ४ तास मन लावून अभ्यास केला. कोणतीही शिकवणी त्याने लावली नाही.
त्याच्या यशाचे श्रेय तो वडील, कन्या शाळेचे शिक्षक रावसाहेब िशदे, आई, शिक्षिका सुरेखा तोरणे, फुलचंद चाटे, पंकज पाटील, दत्तात्रय आरोटे, विजय बनकर, अशोक तुपे यांना देतो. त्यांचे यथोचित मार्गदर्शन मिळाल्याचे शुभमने सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरांत जाऊन आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवावी असे आवाहन त्याने केले. त्याचे यशाबद्दल आमदार अशोक काळे, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी महिला मंडळाच्या अध्यक्ष स्नेहलता कोल्हे, प्रभारी नगराध्यक्ष मीनल खांबेकर, पत्रकार महेश जोशी, मनोज जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.