यशराज फिल्म्सच्या ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाच्या टीमला ‘स्क्रीन’ सिनेसाप्ताहिकाच्या ‘स्क्रीन प्रिव्ह्य़ू’ कार्यक्रमासाठी नुकतेच आमंत्रित करण्यात आले होते. दिग्दर्शक मनिष शर्मा, लेखक जयदीप साहनी, नवोदित अभिनेत्री वाणी कपूर आणि प्रमुख भूमिकेतील परिणीती चोप्रा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रेमीयुगुलातील प्रणय, प्रेमकथापट याविषयीच्या वेगवेगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
चित्रपटाच्या नावातच ‘शुध्द देसी रोमान्स’ आहे म्हटल्यावर रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट करताना तुमच्या लेखी प्रेम आणि प्रणयाच्या कल्पना नेमक्या काय आहेत?, असा थेट प्रश्न दिग्दर्शक मनिष शर्माला विचारला गेला. त्यावर उत्तर देताना मनिष म्हणाले की, वयाच्या चाळीशीत प्रणय आणि प्रेमाविषयीच्या व्याख्या बदललेल्या असतात. सोळाव्या वर्षीच्या कोवळ्या प्रेमातील भावना निराळ्या असतात. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांप्रमाणेच माझ्या मनातील व्याख्याही वेळोवेळी बदलत गेलेली आहे. चित्रपटाचे लेखक जयदीप साहनी यांनी तर मान्यच केले की या विषयावर प्रथमच कथा लिहिलीय. ‘शुद्ध देसी रोमान्स’ ही तिघांची गोष्ट असून प्रेम, आकर्षण, वचनबद्धता या गोष्टींचे अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न या प्रमुख तीन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून केला गेला आहे. खरं म्हणजे प्रेम भावनेविषयी या सिनेमाच्या माध्यमातून आपण स्वत:च व्याख्या शोधू पाहतोय, असे लेखकाने प्रांजळपणे मान्य केले. नवोदित अभिनेत्री वाणी कपूरच्या मते ‘प्रेमाची किंवा प्रणयाची निश्चित अशी व्याख्या सांगता येत नाही. प्रणयी युगुलामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला कसे प्रेम देऊ शकता?, ते माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे ठरते.’
आवडलेल्या रोमॅण्टिक चित्रपटांविषयी सांगताना लेखक जयदीप साहनी यांनी यश चोप्रा, इम्तियाज अली, गुलजार यांसारख्या दिग्गजांनी केलेल्या चित्रपटांमधील प्रेम आवडले असे सांगितले तर दिग्दर्शक मनिष शर्मा यांनी ‘लम्हे’ हा रोमॅण्टिक चित्रपटांमध्ये वरच्या फळीतील चित्रपट ठरावा, असे आपले मत व्यक्त केले. तर वाणी कपूरला रोमॅंटिक चित्रपट म्हणून ‘हम दिल दे चुके सनम’ आणि  ‘दिल से’ या दोन चित्रपटांना पसंती दर्शवली.
‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातील व्यक्तिरेखांबद्दल तपशीलात बोलताना लेखक साहनी म्हणाले की ही तीन तरुण व्यक्तींची गोष्ट आहे. ते प्रेमात पडतात, त्यांच्या रोमॅण्टिक नात्याचा वेध घेऊ पाहतात. सुशांत सिंग राजपूतने ‘रघु’ ही भूमिका साकारली आहे. त्याच्याकडे सगळे आहे फक्त प्रेम नाही आहे. म्हणून तो प्रेमाचा शोध घेतोय. परिणीती चोप्राने साकारलेली गायत्री प्रेमाच्या बाबतीत रघुपेक्षा अनुभवी आहे. वाणी कपूरने साकारलेली तारा ही भूमिका म्हणजे तद्दन पारंपरिक घरातील मुलगी आहे. अनेक गोष्टी मुलींना लग्नापूर्वी करण्यासाठी पालक मनाई करतात. अमूक एक गोष्ट तू लग्नानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यावर कर हो..असे सांगितले जाते. वास्तविक मुलीला माहीत असते की लग्नानंतर नवऱ्याच्या घरीसुद्धा अमूक एक गोष्ट करण्यासाठी तिला मनाई केली जाणार आहे. या तीन व्यक्तिरेखा आपापल्या परीने आयुष्याचा, प्रेमाचा अर्थ लावू पाहताहेत.
दिग्दर्शक मनिष शर्मा यांनीही जयदीपच्या मुद्याला दुजोरा देत विशीतील आजची तरुणाई या चित्रपटातील अनेक मुद्दय़ांशी सहमत होईल, असे मत व्यक्त केले. विसाव्या वर्षी आणि तिशीपर्यंत अनेक गोंधळ प्रत्येकाच्या मनात असतात. आपल्याकडून कोणत्या अपेक्षा पालक-समाज करीत आहे आणि आपण त्या पूर्ण करू शकतो किंवा नाही याबाबत त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे असतात. चित्रपटातील व्यक्तिरेखाही काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना त्यांच्या मनाचे ऐकायचे आहे पण, त्यासाठी बंडखोरी करण्याची त्यांची इच्छा नाही. सर्व प्रमुख व्यक्तिरेखा निरागस, प्रामाणिक आहेत पण, भवतालच्या बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेतान त्यांची स्थिती दोलायमान होते. या चित्रपटात खरोखरच आजच्या तरूणाईचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल, असे मनिष शर्मा यांनी सांगितले.
रोमान्स ‘शुद्ध देसी’ कसा?, या प्रश्नावर आज देशभरातील तरूणाईच्या मनातला जो गोंधळ आहे, त्यांच्या मनात उमलणारी प्रेमभावना आणि पारंपारिक प्रेम, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था याबद्दलचे नियम, तत्व या कचाटय़ात देशातील अनेक छोटय़ा-मोठय़ा शहरांमधली तरूण पिढी सापडली आहे. ही गोष्य जयपूरसारख्या शहरातील आहे. पण, मुंबई-दिल्लीकडे पाहण्याची सवय नसलेल्या आपल्यासारख्यो लोकांना जयपूर, राजस्थान हीसुध्दा शहरे आहेत हेच लक्षात येत नाही. म्हणूनच ‘शुध्द देसी रोमान्स’ असे म्हटल्याचे साहनी यांनी स्पष्ट केले.भले दिल्ली, मुंबई यासारखे मोठे शहर नसले तरी चित्रपट मध्यमवर्गातील लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे शहर मोठे आहे किंवा छोटे हा प्रश्न नाही, असे साहनी यांनी नमूद केले. राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट सामाजिक संदेश देणारा नसला तरी काहीतरी निश्चितपणे सांगून जाणारा चित्रपट नक्कीच आहे, असे परिणीती चोप्राने आवर्जून सांगितले. अंतर्गत संघर्ष हा आजच्या तरुणाईला भेडसावतोय हे खरे आहे. कुटूंब, धर्म, सामाजिक प्रतिष्ठा यातले नाटय़ हे जुने विषय आहेत. परंतु, आजची तरुणाई स्वतंत्र, स्वावलंबी आहे. त्यांना निवडीचे स्वातंत्र्य मिळते आहे, त्यांना ते हवेच आहे. त्यांची स्वत:ची निश्चित ठाम अशी मते आहेत, त्यांचे प्रतिबिंब ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये नक्कीच पाहायला मिळेल, अशी खात्रीही परिणीती चोप्राने दिली.