जागतिक सिकलसेल दिन विशेष
सिकलसेल या अनुवंशिक आजाराने दुर्गम भागात हातपाय पसरविण्यास सुरूवात केली असली तरी हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण नऊ आदिवासी तालुक्यांमध्ये ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १३ ग्रामीण रुग्णालयांच्या कक्षेत सिकलसेल आजार जनजागृती व नियंत्रण  कार्यक्रम सुरू आहे. आजतागायत जिल्ह्यात एकूण ४,६०,२७९ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १५९५ वाहक व्यक्ती आणि ५८ सिकलसेल ग्रस्त व्यक्ती आढळून आल्या असल्याची माहिती ‘गौरी’ सामाजिक संस्थेच्या रोहिणी नायडू यांनी दिली आहे.
१९ जून या जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त या आजारविषयक जनजागृतीची मोहीम जिल्ह्यात अधित तीव्र करण्यात येणार आहे. प्रकल्प सर्वेक्षणानुसार नाशिकच्या आदिवासी तालुक्यांमधील लोकसंख्या १२.०२ लाख इतकी असून, आजमितीस झालेल्या रक्त चाचण्यांमधून सिकलसेल आजाराचे प्रमाण पाच ते सात टक्के आढळते. सिकलसेल आजार जनजागृती व नियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात २००७ पासून सुरू झाली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत नोव्हेंबर २००८ पासून या जिल्ह्यात कार्यक्रमाची सुरूवात झाली असेही नायडू यांनी म्हटले आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्तींच्या तांबडय़ा रक्तपेशींना ऑक्सीजनचा पुरवठा कमी झाल्यास त्या आपल्या आकार बदलतात. हा आकार अर्धचंद्राकृती विळ्यासारखा असतो. अशा सिकलसेल वेगाने नष्ट होतात. लाल रक्तपेशींचा आकार व पृष्ठभागावरील बदलामुळे या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात. त्यामुळे हृदय, मूत्रपिंड, मेंदु, यकृत यासारख्या अवयवांना होणारा रक्त पुरवठा बंद होऊन शरीरातील हाडे, पाठ, छाती यामध्ये तीव्र वेदना होतात.
सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार आहे. जो आई-वडिलांपासून मुलांना होतो. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. या आजारात सामान्यत: गोलाकार असणाऱ्या तांबडय़ा रक्तपेशी कोयत्याच्या पात्याचा आकार धारण करीत असल्याने या आजारास ‘सिकलसेल’ असे नाव देण्यात आले आहे. १९१० मध्ये डॉ. जेम्स हॅरिक यांनी या आजाराचा शोध अमेरिकेत लावला. महाराष्ट्रातील रायगड, पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या आजाराची लक्षणे बाळ जन्माला आल्यानंतर सहाव्या महिन्यापासून दिसायला लागतात. सिकलसेलच्या रुग्णांमध्ये रक्तक्षय हे प्रमुख लक्षण दिसून येते. रक्तक्षय म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे होय. त्यामुळे रुग्णाला वारंवार विषाणू या जिवाणूंचा संसर्ग होऊन ताप येणे, हाडांमध्ये, सांध्यात, स्नायू, छाती, पोट, पाठ दुखणे, यकृताला सूज येणे, नेहमी कावीळ होणे, दृष्टी कमी होणे, पायावर बरा न होणारा फोड होणे, पक्षाघाताचा झटका येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.
या आजारापासून बचावासाठी अती थंडी व अती गर्मीपासून रुग्णांचा बचाव करावा, नेहमी भरपूर पाणी प्यावे, मोठय़ा व्यक्तिंनी दिवसभरात आठ ते १० ग्लास पाणी प्यावे, संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे. संसर्गजन्य रोगांचे प्रमाण सिकलसेल रुग्णात पहिल्या पाच वर्षांत जास्त असते, असे निरीक्षणही नायडू यांनी नोंदविले आहे.