सिडकोने २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुर्नबांधणी करण्याची वेळ आली आहे. त्यावरुन सिडकोने बांधलेल्या घरांच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. हा दर्जा किती ‘उत्तम’ आहे याचे हे ‘उत्तम’ उदाहरण आहे. २५ वर्षांत एखादे घर निकामी होते ही चांगली गोष्ट नाही, अशा शब्दात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सिडकोच्या निकृष्ट घरांच्या बांधकामावर टीका केली, विशेष म्हणजे पवार मुख्यमंत्री असताना (७८-८०)वाशी येथील जेएनवन जेनएनटु प्रकारातील २१७ इमारतींच्या कामाला सुरुवात झाली होती.
सिडकोच्या वतीने खारघर येथे उभारण्यात आलेल्या गोल्फ कोर्स व स्कायवॉकचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्यावेळी त्यांनी सिडकोच्या मोठय़ा प्रकल्पाची स्तुती करताना त्यावर बोचऱ्या शब्दात टीकाही . सिडकोने बांधलेला गोल्फ कोर्स हा सर्वसामान्य माणसासाठी नसून तो महागडा खेळ आहे. एका दिवसाला तुमच्या खिशात १५०० रुपये असतील तरच तुम्ही हा खेळ खेळू शकता याचे गणित पवार यांनी उलगडून सांगितले. मी कधीकाळी गोल्फ खेळत होतो हे सागण्यासही ते विसरले नाहीत. गोल्फ कोर्सची हिरवळीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा खर्च आकरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले मात्र नवीन पिढीसाठी सिडकोने खेळाचे दर कमी करावेत अशा सूचना  त्यांनी केली. सिडकोने बांधलेल्या स्कायवॉक वरील त्यांनी काही त्रुटी स्पष्ट शब्दात मांडल्या. सिडकोने खारघर रेल्वे स्टेशन ते उपनगरापर्यत बांधलेला पावनेदोन किलोमीटर लांबीचा स्कायवॉक व्यायामासाठी बांधला असेल तर ठिक आहे कारण वांद्रे येथील स्कायवॉकवर पादचारी चालताना मी क्वचित पाहिले आहेत. जगाच्या पध्तती आपण स्वीकारल्या असतील तर मग तेथील सुविधाही स्वीकारण्याची गरज आहे. इतक्या मोठय़ा लांबीचा स्कायवॉक बांधताना त्यावर जेष्ठ नागरीक महिला, अपंगासाठी सरकता जिना (एक्सलेटर) का नाही बांधला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या सारख्या जेष्ठ नागरिकांनी चार पाच जिने चढायचे कसे असा सवालही त्यांनी केला. त्यापूर्वी स्कायवॉक बनवायचे की नाहीत याचा विचार प्रशासनानी करण्याची गरज असल्याचे ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत मांडले.