गेल्या दहा दिवसांपूर्वी सोलापुरात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी संशयित तरुणांना मध्य प्रदेश दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने अटक करून तीन शक्तिशाली बॉम्ब हस्तगत केल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला येत्या १२ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेत महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. यात्रेचे स्वरूप पाहता सुरक्षाव्यवस्थेवर मोठा ताण पडणार आहे. किंबहुना पोलीस प्रशासनासमोर यात्राकाळात सुरक्षा व्यवस्थेचे आव्हान उभे राहिले आहे.
ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेची परंपरा साडेआठशे वर्षांपासून म्हणजे बाराव्या शतकापासून चालत आहे. रविवारी, १२ जानेवारी रोजी यात्रेला प्रारंभ होत आहे. स्वत: श्री सिद्धेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात सोलापूरच्या पंचक्रोशीत प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्याच्या विधीने सुरू होणा-या या यात्रेची माहिती सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. १३ रोजी सिद्धेश्वर मंदिराबाहेर तलावालगत संमती कट्टय़ावर संमतीभोगी अर्थात अक्षता सोहळा संपन्न होणार आहे, तर दि. १४ रोजी मकरसंक्रांतीला रात्री होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा होणार आहे. दि. १५ रोजी होम मैदानावर शोभेचे दारूकाम सादर होणार असून, दि. १६ रोजी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वज वस्त्रविसर्जनाने यात्रेची सांगता होणार आहे. यानिमित्ताने दि. १२ ते १६पर्यंत दररोज पूर्वापार परंपरेनुसार नंदीध्वजांच्या मिरवणुका निघणार आहेत.
अक्षता सोहळय़ादिनी नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर संस्कारभारती संस्थेतर्फे रांगोळीद्वारे तीन किलोमीटर अंतरावर पायघडय़ा घालण्यात येणार आहेत. तर दि. १४ रोजी मकरसंक्रांतीदिनी नागफणी बांधलेल्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीच्या वेळी कला फाऊंडेशनच्या वतीने रांगोळीच्या पायघडय़ा घालण्यात येणार आहेत.
यात्रेनिमित्त होम मैदान व पंचकट्टा परिसरात विविध कला करमणुकीची साधने, तसेच गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, रेडिमेड गारमेंट आदी आबालवृद्धांचे आकर्षण ठरणा-या १४७ दालनांची उभारणी केली जात आहे. यात महाराष्ट्रातून १९६ दालने येतील तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी प्रांतांतूनही विविध प्रकारची दालने यात्रेचे आकर्षण राहणार असल्याचे काडादी यांनी सांगितले. यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसरात नेत्रदीपक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, तलावाभोवतीच्या या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघत आहे. दि. १३ रोजी अक्षता सोहळय़ाप्रसंगी माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांच्या वतीने सिद्धेश्वर मंदिरावर विमानातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
यात्रेनिमित्त होम मैदानावर यंदा काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते यांनी प्रमुख पुढाकार घेतला आहे. हे कृषिप्रदर्शन दि. १६ ते २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात शेतीसंबंधी सर्व उद्योजकांची अद्ययावत उपकरणे पाहावयास उपलब्ध होणार आहेत. हे प्रदर्शन अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजिकल मॅनेजमेंट एजन्सीज अर्थात ‘आत्मा’ या केंद्र शासनपुरस्कृत संस्थेने पुरस्कृत केले आहे. याशिवाय द्राक्ष, डाळिंब, ऊस व उन्हाळी भुईमूग आदी पिकांसाठी तज्ज्ञांच्या सहभागातून डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात चर्चासत्र तथा व्याख्याने आयोजिली आहेत. यात्रेच्या नियोजनासाठी विविध विषय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यात्रा मध्यवर्ती समितीचे प्रमुख मल्लिकार्जुन कावळे आहेत, तर जागा वाटप समिती (गुंडप्पा कारभारी), मिरवणूक समिती (मल्लिनाथ जोडभावी),रंग व विद्युतरोषणाई समिती (गिरीश गोरनहळ्ळी), जनावर बाजार समिती (चिदानंद वनारोटे), शोभेचे दारूकाम समिती (अ‍ॅड. मिलिंद थोबडे), प्रसाद वाटप समिती (सिद्धेश्वर बमणी), कृषिप्रदर्शन समिती (महादेव चाकोते) व प्रसिद्धी समिती (नंदकुमार मुस्तारे) याप्रमाणे विषय समित्या कार्यरत आहेत.