रेल्वे प्रशासनाकडे वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मंगळवार २ एप्रिल रोजी उपनगरीय रेल प्रवासी महासंघाच्या माध्यमातून बदलापूर रेल्वे स्थानकावर एक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम सायं. ४ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्वाक्षरींचे निवेदन मध्य रेल्वेच्या मुंबई मंडल प्रबंधकांना देण्यात येणार आहे.
बदलापूर-मुंबई सकाळी व मुंबई- बदलापूर सायंकाळी अशी एक महिला लोकल सोडावी, बदलापुरातील रेल्वे फलाटांची उंची शासनाने निश्चित केलेल्या कायद्यानुसार वाढविणे, फलाट क्र १ व २वर स्वच्छतागृह बांधणे व त्यांची योग्य ती स्वच्छता राखणे, दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला अंबरनाथ बाजूचा पूल त्वरित बांधणे, जुन्या लेव्हल क्रॉसिंगच्या बदल्यात तेथेच किंवा जवळपास एक सब वे बांधणे, बदलापूर येथे दुसरी आरक्षण तिकीट खिडकी सुरू करणे.
सध्या एकच आरक्षण खिडकी असल्याने तेथे खूपच गर्दी होत असते व त्यामुळे वेळही वाया जातो. फलाट क्र. १ व २ वर संपूर्ण शेड देणे, बदलापूर व आसपासच्या रेल्वे रुळांवर होणाऱ्या अपघातग्रस्त प्रवाशांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ६ ते ८ लायसन्स पोर्टर्सची नियुक्ती करणे आदी १५ मागण्या या निवेदनात असून त्यावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर त्याची प्रत निवेदनासह मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागप्रमुखांना देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रवासी महासंघाचे अ‍ॅड. द. चिं. गोडबोले यांनी सांगितले.