सिग्नल विरहित व्यवस्थेमुळे गेली अनेक वर्षे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालेल्या कल्याण शहरात पुन्हा एकदा सिग्नलचे लाल-पिवळे दिवे लुकलुकणार असून शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त मिळावी यासाठी तब्बल पाच ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. दहा वर्षांपूर्वी कल्याणात जागोजागी सिग्नल बसविण्यात आले. मात्र, बेशिस्त वर्तनाचा नमुना असलेल्या या शहरातील सिग्नल जुमानायचेच नाहीत, अशा पद्धतीने वाहतूक सुरू आहे. कुणीही यावे आणि सिग्नल तोडावे आणि वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यावी, असा सगळा सावळागोंधळ या शहरात सुरू असतो. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले अनेक सिग्नलचे खांब बंद पडले होते. वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पुन्हा एकदा ही यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून वाहतुकीची शिस्त पाळली जावी, यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.   
कल्याण शहरातील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, दुकानदारांचे अतिक्रमण आणि फेरीवाल्यांचा कोंडाळा यामुळे या शहरात रस्ता वाहतुकीची पुरती दुर्दशा उडाली आहे. ती सुधारण्यात वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. महापालिकेच्या वतीने शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी २००४ साली ५४ लाखांचा खर्च करून सिग्नल यंत्रणेची यंत्रणा उभी करण्यात आली होती. कल्याण शहरात दुर्गामाता चौक, सहजानंद चौक, लालचौकी, शिवाजी चौक, काबुलसिंग मार्ग, गुरुदेव जंक्शन, वल्लीपीर मार्ग, सुभाष चौक, नेहरू चौक, काटेमानिवली जंक्शन, महात्मा फुले चौक अशा एकूण अकरा ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले होते. मात्र हे सर्व सिग्नल पूर्णपणे बंद झाले होते. याचा निषेध म्हणून कल्याणच्या एका सामाजिक संस्थेच्या वतीने या सिग्नलची पूजा करून प्रतीकात्मक पद्धतीने शहर प्रशासनाचा निषेध केला होता. मात्र अशा निषेध मोर्चाचादेखील कोणताच परिणाम महापालिका प्रशासनावर पडला नसून अजूनदेखील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचा कोणताच प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांच्या वारंवारच्या मागणीनंतर अखेर महापालिकेने शहरातील दोन सिग्नल सुरू करण्यात यश मिळवले, मात्र तेदेखील काही तासांमध्ये पुन्हा बंद झाले आहेत.
सिग्नल सुरू होत आहेत..
सिग्नल नाहीत म्हणून वाहतुकीला नियम नाहीत आणि शिस्त तर नाहीच नाही, अशी कल्याण शहराची सध्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीत बदल व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नव्याने प्रयत्न सुरू केले असून  सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. सहजानंद चौक परिसरात दोन तर डोंबिवलीमध्ये तीन सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. पालिकेकडे पोलिसांनी मागणी केल्यानंतर पालिका त्यावर योग्य निर्णय घेत असते. मात्र तशी कोणतीच मागणी पालिकेकडे नसून पालिका फक्त यंत्रणा सुरू करते. त्याच्या नियमनाची पूर्ण जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
सर्व सिग्नल कार्यान्वित करा..
सर्व सिग्नल कार्यान्वित करा अशी वाहतूक पोलिसांची मागणी असून महापालिकेकडून त्याकडे कायमच दुर्लक्ष होत आहे. कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीवर पयार्य ठरणारा गोविंदवाडी बायपास रखडल्याने त्याचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला होतो आहे. झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंगचीदेखील कोणतीच योजना कार्यान्वित होत नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे मत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब पवार यांनी सांगितले.