राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची स्थिती नाजूक आहे, अशा सर्व जिल्हा अध्यक्षांच्या कामाचा आढावा पक्षाकडून घेण्यात आला असून त्यापैकी काही ठिकाणी बदल करण्यात येणार असून त्यात जळगावचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
अध्यक्ष बदलण्याचे केवळ संकेत मिळत असताना जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आली आहेत. जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी या संदर्भात स्वत:च स्पष्टीकरण दिले असून जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती नाजूक असल्याचे मान्य करतानाच  दोन वर्षांत पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेले यश पाहता पक्षश्रेष्ठींनी समाधान व्यक्त केले असल्याने जळगावचा अध्यक्ष बदलण्याचा प्रश्नच नसल्याचे मत व्यक्त केले असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसकडून नुकताच या दहा जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मोजक्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. त्यातही गेल्या विधानसभेत लढलेल्या परंतु पराभूत झालेल्या उमेदवारांनाच बोलाविण्यात आले होते.
अंमळनेरहून निवडणूक लढलेल्या ललिता पाटील, जामनेरचे संजय गरूड, रावेरचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा चर्चेसाठी गेलेल्यांमध्ये समावेश होता. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील दहा अध्यक्ष एकाच वेळी बदलण्यापेक्षा त्यांच्या कामाचा व पक्षाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यातही दहा अध्यक्षांमध्ये जे लागोपाठ दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष झाले, अशा चौघांच्या कामगिरीवर पक्षाने नाराजी प्रकट केल्याचे सांगण्यात येते. जळगाव जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिका निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश काँग्रेसला मिळाले आहे. दुसऱ्यांदा अध्यक्ष होऊनही ज्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसच्या यशाची स्थिती नगण्य आहे अशांना पदापासून दूर व्हावे लागेल अशी माहिती पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा काँग्रेसमधील विरोधी गट मात्र अध्यक्ष बदलला जाणार असल्याची चर्चा करीत आहे. त्यासाठी डी. जी. पाटील, संदीप पाटील आदींची नावे चर्चेत आणण्यात येत असल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे.