जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले
पत्रकारांच्या संरक्षणासाठी सक्षम व प्रभावी कायदा असावा, या मागणीसाठी राज्य पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधिमंडळासमोर पत्रकारांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी बुलढाणा जिल्हा, मुख्यालय व शहरातील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कचेरीवर भव्य मूक मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व पत्रकार हल्ले प्रतिबंध राज्य समितीचे सदस्य सोमनाथ सावळे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सावळे, बुलढाणा जिल्हा प्रेस कौन्सीलचे अध्यक्ष सुधाकर अहेर, सरचिटणीस राजेश डिडोळकर, जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडिया रिपोटर्स असोसिएशनचे संजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार पी.पी.कोठारी, राजेश शेगोकार, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अरुण जैन, नितीन सिरसाट, राजेंद्र काळे, सुखनंदन इंगळे, रणजीतसिंग राजपूत, गजानन धांडे, बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, शहराध्यक्ष हर्षनंदन वाघ, सरचिटणीस गोपाल हागे, सचिन लहाने यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकारांनी केले. या मोर्चात जिल्हा व शहरातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते.
जिल्हा पत्रकार भवनापासून पत्रकारांच्या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, असे भव्य बॅनर्स लावून निघालेला हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, क ोर्ट रोड या मार्गे जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी.जी.वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी बी.के.इंगळे यांना सविस्तर निवेदन सादर केले. राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांंपासून पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा अकारण प्रलंबित ठेवला आहे. पत्रकारांच्या भावना शासनाला कळवाव्यात, असे आग्रही प्रतिपादन पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले.
संरक्षण कायद्याच्या बाबतीत पत्रकारांच्या भावना राज्य सरकार व राज्यपालांना कळविण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी बी.जी. वाघ यांनी पत्रकारांना दिले. जिल्ह्य़ातील चिखली, मेहकर, देऊळगावराजा, लोणार, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, सिंदखेडराजा येथेही पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पत्रकारांनी एकजुटीचे प्रदर्शन करून आंदोलन केले.