शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापुरात सन्नाटा पसरला. शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांत शोकाकुल वातावरण झाले. शहरात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला गेला. बाजारपेठेसह सर्व भागांतील दुकाने बंद राहिली. शिवसेनेच्या शाखांसह तरुण मंडळांच्या फलकावर सेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात होते. अनेक ठिकाणी त्यांच्या छायाचित्रांना पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. सर्वत्र शांतता असली तरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्तास उभे होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यापासून शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी महालक्ष्मीला दंडवत व गणेश मंदिरात मंत्रजप करण्यात आला होता. प्रकृती सुधारत असल्याचे वृत्त ऐकून शिवसैनिकांनी नि:श्वास सोडला होता. तथापि, आज दुपारी सेना प्रमुखांच्या निधनाचे वृत्त ऐकून शिवसैनिकांना धक्का बसला. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्राणप्रिय नेतृत्व हरपल्याने काय बोलावे, काय करावे हेच शिवसैनिकांना कळत नव्हते. सर्वत्र शोककळा पसरली होती.
 सायंकाळी शिवाजी चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले होते. शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मनसे, हिंदू एकता आंदोलन विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले होते. सेनाप्रमुखांचे भले मोठे कटाउट तेथे लावण्यात आले होते. त्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
सेनाप्रमुखांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूर शहरावर शोककळा पसरली. शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने पटापट बंद केले. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, गंगावेश, गुजरी पेठ आदी व्यापारी पेठेतील सर्वच दुकाने बंद करण्यात आली. महापालिकेची बससेवा बंद झाली होती. रिक्षा वाहतूकही जवळपास बंद होती. त्यामुळे शहरात बंदसदृश्य वातावरण होते.
शहरातील शिवसेनेच्या शाखांच्या फलकांजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. त्यांना श्रद्धांजली वाहणार मजकूर त्यावर लिहिण्यात आला होता. त्याचबरोबर सार्वजनिक तरुण मंडळे, तालीम, संस्था यांनीही आपल्या फलकावर सेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहिली होती. सेनाप्रमुखांच्या निधनाचे वृत्त अनपेक्षित असल्याने नागरिकांत त्याची एकच चर्चा होती. प्रत्येक चौकात, गल्लीत याच विषयावर नागरिक गटागटाने चर्चा करताना दिसत होते. सेनाप्रमुखांच्या कोल्हापुरातील विविध घटनांची आठवण काढली होती. त्यातून सेनाप्रमुखांच्या नेतृत्व व कर्तृत्वाचा आढावा नागरिक आपल्या परीने घेत होते.