‘साडी’ आणि साडय़ांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय. एखाद्या समारंभात किंवा प्रवासातही महिला आपल्या साडीबरोबरच अन्य महिलांच्या साडय़ांवर आवडीने चर्चा करतात. साडय़ांमधील नवीन डिझाईन्स, प्रकार या विषयीच्या गप्पा अव्याहत सुरु असतात. साडय़ांचा एखादा सेल किंवा प्रदर्शन त्यांच्यासाठी विशेष जिव्हाळ्याचे असते. अशा या विविध प्रकारच्या साडय़ा एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या तर महिलांसाठी तो सुवर्णयोग ठरेल.
भारत सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय, विकास आयुक्त हस्तकला विभाग आणि राष्ट्रीय हस्तकला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग जुळून आला आहे. भारतातील विविध राज्यातील हस्त कारागिरांनी तयार केलेल्या साडय़ांचे भव्य प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील एक्स्पो सेंटर येथे भरलेले हे प्रदर्शन येत्या ३ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
प्रदर्शनात पंधरा राज्यांमधील सुमारे १०० हस्तकला संस्था सहभागी झाल्या आहेत. भारत सरकारने हातमाग उत्पादनांसाठी ‘हॅण्डलूम मार्क’ आणि सिल्क उत्पादनांसाठी ‘सिल्क मार्क’ योजना सुरु केली आहे. हातमाग/हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे, या कलाकारांनी तयार केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावित या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनात महाराष्ट्र राज्याचे खास वैशिष्ठय़ असलेली पैठणी व पुणेरी साडी पाहायला मिळणार आहे. तसेच गढवाल, पोचमपल्ली, धर्मावरम (आंध्र प्रदेश), मुगा सिल्क (आसाम), टसर, मधुबनी पेंटिंग (बिहार), काथा आदिवासी कला, कोसा सिल्क (छत्तीसगड), प्रिंटेड सिल्क साडय़ा (नवी दिल्ली), गठजोरा, पटोला (गुजरात), काथा, कोसा सिल्क (झारखंड), प्रिंटेड सिल्क साडय़ा, ड्रेस मटेरियल (काश्मीर), चिंतामणी, कर्नाटक सिल्क (कर्नाटक), चंदेरी, महेश्वरी (मध्य प्रदेश), बोम्कई, संबलपूरी (ओडिसा), कांजिवरम (तामिळनाडू), बंधेज (राजस्थान), तनछुई, जामदानी, जामेवार- बनारसी (उत्तर प्रदेश), बलुचरी, कांथा, तंगाईल (पश्चिम बंगाल) आदी विविध प्रकारच्या साडय़ाही येथे पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री आठ अशी आहे.