रेशीम उद्योग हा शेतीसाठी उत्तम जोडधंदा असल्याने तुतीची लागवड करून शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन वाढवावे, असे केल्यास निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी केले.
जिल्ह्य़ात तुती लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी नागपूर जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने पारशिवनी तालुक्यातील निलज येथे रेशीम शेती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रेशीम संचालनालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर हिवरे, केंद्रीय रेशीम मंडळाचे उपसचिव डॉ. विजयकुमार, प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक श्रीधर झाडे, रेशीम उत्पादन शेतकरी अन्नाजी गोतमारे, चंद्रभान धोटे, शिशुपाल मेश्राम, रेशीम सूत उत्पादक प्रशांत खंगार, शेतकरी नेते संजय सत्यकार प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव व त्यांना मिळालेल्या आर्थिक लाभाची माहिती देऊन रेशीम शेती कशी फायद्याची ठरू शकते, याची माहिती दिली. प्रत्येक शेतकऱ्याला एक ते दोन एकरमध्ये तुती लागवड करता येते. तसेच समूहामध्ये ५० ते ६० एकर लागवडही करता येत असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय रेशीम मंडळाचे विजयकुमार यांनी केंद्र शासनाच्या रेशीम विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त महिला बचतगटासह निलज, खंडाळा, झुल्लर, कंरभाड, सालई, कान्हादेवी, गादा, बोरी, कांद्री, सोनखांब या गावातील पुरुष व महिला शेतकरी मोठय़ा संख्येने उपिस्थत होते.
रेशीम विभागाचे सहायक संचालक श्रीधर झाडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. रेशीम विकास अधिकारी प्रदीप कुरसंगे यांनी संचालन करून आभार मानले. कामठीचे रेशीम उत्पादक सलीम अन्सारी, जिल्हा रेशीम कार्यालयातील रामहरी घुरडे, विनोद काकडे, नंदकुमार सातपुते, श्रीकृष्ण डामरे यांनी रेशीम प्रदर्शन आयोजित करून मेळाव्यातील शेतकऱ्यांना योजनेची सविस्तर माहिती दिली.