देहदानाचे महत्त्व समाजाला पटवून सांगण्यासाठी स्थापन झालेल्या दधिची देहदान मंडळाच्या सामाजिक कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली. अशा प्रकारचे कार्य करणारी देशातील ही पहिली एकमेव नोंदणीकृत संस्था आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मंडळातर्फे ‘स्मरणगाथा’ नावाची स्मरणिका एका कार्यक्रमात नुकतीच प्रकाशित करण्यात आली.
दधिची देहदान मंडळाच्या ‘स्मरणगाथा’ प्रकाशनाचा कार्यक्रम आदित्य मंगल कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास तांबे, माजी अध्यक्ष अच्युत दीक्षित, विद्यमान अध्यक्ष विनायक जोशी, ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, वसंत दाते, स्मिता तळेकर उपस्थित होते.
गुरुदास तांबे यांनी मंडळाच्या स्थापनेपासूनची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, प्रत्येक धर्मामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे यथायोग्य अंत्यविधी केले नाही, तर आपल्या कुटुंबामागे पीडा लागेल, अशी भ्रामक भीती अनेकांना असते. त्यामुळे एखाद्या नागरिकाने देहदानाची इच्छा व्यक्त केली तरी त्यांचे नातेवाईक त्या नागरिकाचे मरणानंतर अंत्यविधी उरकतात. देहदान केल्याने मानवी शरीराचे खूप तुकडे केले जातात, अशी एक भ्रामक कल्पना समाजात आहे. अनेक डॉक्टरांचाही देहदान संकल्पनेला विरोध आहे. देहदानासाठी ऐरोली येथील बर्न सेंटरचे पथक ठाणे जिल्’ााच्या निम्म्या भागात भ्रमंती करीत असते. देहदान ही सोपी प्रक्रिया आहे. त्याविषयी गैरसमज मात्र खूप पसरविण्यात आले आहेत. दधिची मंडळ, ज्ञानप्रबोधिनी संस्था या विषयी जनजागृती करीत आहेत. स्मरणिकेच्या माध्यमातून देहदान प्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात आला आहे, असे तांबे म्हणाले.
गुरुदास तांबे यांनी आयुष्यभर देहदान कार्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. त्यांचा सरळमार्ग आणि स्वच्छ चारित्र्यामुळे मंडळाच्या कार्यात कधी कोणते अडथळे आले नाहीत, असे दीक्षित म्हणाले. जगण्यातील सांस्कृतिक विचार लोप पावला आहे. या भावभावनांच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी आता समाजाला बुद्धिनिष्ठ विचार आणि प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे, असे गिरीश कुबेर म्हणाले. यावेळी सुधा शहा, दामोदर बहिरट, मालती दामले, इंदुमती बापट, लीला तांबे, प्रभाकर भिडे, त्र्यंबक जोशी, मधुसूदन शेंबेकर या निबंध स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.