सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहू नये याची काळजी घेण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात असले तरी त्यात अधिक भर हा आपत्ती निर्माण झाल्यानंतर काय करावे, यावर देण्यात येत आहे. हे करणे आवश्यक असले तरी आपत्तीपूर्व नियोजनही आवश्यक असून अशा नियोजनाकडे प्रशासनाकडून फारसे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे.
यंदाच्या कुंभमेळ्यातील पर्वणींसाठी ८० लाख ते एक कोटीपर्यंत भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर शहरात गर्दी जमा होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. मागील सिंहस्थात शाही मिरवणुकीच्या वेळी पंचवटीत चेंगराचेंगरीची घटना घडून सिंहस्थाला गालबोट लागले होते. यंदाच्या कुंभमेळ्यात असे काही होऊ नये म्हणून प्रशासनाने गर्दीच्या नियोजनावर अधिक भर दिला आहे. त्यातही शाही मिरवणुकीच्या मार्गास अधिक महत्व देण्यात आले आहे. या मार्गासाठी सुरक्षिततेचे सूक्ष्म नियोजन केले जात असून या मार्गावरील नागरिकांनाही त्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. चेंगराचेंगरीसारखी घटना घडल्यास काय करावे, हेही सांगितले जात आहे. मुळात प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत झालेल्या विविध कार्यशाळांमध्ये आपत्ती उद्भवल्यानंतर कसे तोंड द्यावे, याविषयीच अधिक माहिती दिली जात आहे. परंतु आपत्ती निर्माण होण्याची ठिकाणे निश्चित करून आपत्तीच निर्माण होऊ नये यासाठी नियोजनात कमतरता जाणवत आहे. कुंभमेळ्याचा मुख्य कार्यक्रम गोदाकाठावरच राहात असल्याने नाशिक आणि पंचवटीतील सर्व रस्ते गोदाकाठाच्या दिशेने गर्दीने वाहणार आहेत. त्यापैकी काही रस्त्यांचा अपवाद वगळता शहरातून जाणारे अनेक रस्ते अरूंद स्वरूपाचे आहेत.
जुन्या नाशिकमधून गोदाकाठाकडे जाण्यासाठी तर रस्त्यांपेक्षा बोळांचाच वापर अधिक होतो. अशा रस्त्यांवरील धोके बाजूला करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. उदाहरणार्थ नाव दरवाजा भागात काही धोकादायक इमारती आहेत. सिंहस्थ ऐन पावसाळ्यात असल्याने पर्वणीच्या दिवशी कोणताही धोका उ्दभवू नये म्हणून अशा इमारती पाडणे किंवा त्यांच्याभोवती संरक्षणात्मक व्यवस्था करण्याची गरज आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास हा संपूर्ण मार्गच बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या जुन्या नाशिकमध्ये अधिक प्रमाणावर असली तरी पंचवटीतही हा धोका बऱ्यापैकी आहे. अशी ठिकाणे केवळ निश्चित करून चालणार नाही. तर, त्या परिसरातील नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. काही अनुचित प्रसंग उद्भवल्यास घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, हे त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा उपक्रम या भागात प्रशासनाच्या वतीने अद्याप राबविण्यात आला नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय अशा गल्ली-बोळांमध्ये उघडय़ावर लटकणाऱ्या विद्युत तारांचे प्रमाण अधिक आहे. या तारा बहुतांश ठिकाणी इतक्या जुनाट झाल्या आहेत की, बऱ्याच ठिकाणी ‘स्पार्किंग’चे प्रकार होत असतात. उघडय़ावरील या तारा गर्दीच्या वेळी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अशी धोकादायक ठिकाणे हेरण्याचे काम विद्युत विभागाला करणे भाग आहे. गटारी भूमिगत करण्याचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी ज्या ठिकाणी हे काम अपूर्ण आहे, ते त्वरीत पूर्ण करण्यासाठी पालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे. जुन्या नाशिकसह इतर भागातूनही नदीकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांना उतार आहे. त्यामुळे किरकोळ पावसातही या रस्त्यांवरून जणूकाही नदी वाहात असल्याचा भास होतो. पावसाचे प्रमाण जर मुसळधार असेल तर या उतारावरील रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड वेग असतो. पाण्याच्या या वेगात सर्व नियोजनही वाहून जाऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणा आपत्तीपूर्व नियोजनासाठी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांकडून सूचना किंवा त्यांचे प्रबोधन ज्या प्रमाणात करेल, त्या प्रमाणात सिंहस्थातील धोके कमी होण्यास मदत होऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.