सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान बंदोबस्तासाठी नियुक्त केले जाणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी कोणत्याही कारणास्तव आपल्या नेमून दिलेल्या जागेवरून इतरत्र भरकटू नयेत, यावर पोलीस आयुक्तालयाने नियोजनात विशेष लक्ष दिले आहे. शाही पर्वणीच्या दिवशी बंदोबस्तावरील कोणी कर्मचारी भोजनासाठी जरी आपल्या जागेवरून हलल्यास काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत या काळात नेमलेल्या जागेवर त्यांनी कायमस्वरुपी तैनात रहावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्तावरील हजारो पोलिसांना ते तैनात असलेल्या ठिकाणीच भोजन देण्याची व्यवस्था करण्याचे निश्चित केले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन विविध पातळीवर सुरू असले तरी या प्रक्रियेत पोलीस यंत्रणेची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन हे सर्वात मोठे आव्हान आहे. ते सक्षमपणे पेलण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात इतर शासकीय विभागांचे सक्रिय योगदान तितकेच आवश्यक आहे. मागील कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी होऊन ३४ जणांना प्राण गमवावे लागले होते. अतिशय अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमण करणारी ही मिरवणूक शांततेने पार पाडण्याच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेचे नियोजन सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ ते १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरातील वेगवेगळ्या भागात तैनात राहणार आहे. त्यातील जवळपास १० ते १२ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बाहेरगावहून मागविले जाणार आहेत. उर्वरित शहर पोलिसांचा फौजफाटा असेल. बाहेरगावहून इतक्या मोठय़ा संख्येने दाखल होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था योग्य पध्दतीने झाल्यास ते बंदोबस्त सक्षमपणे करू शकतील. या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी ३२ तात्पुरत्या छावण्या उभारण्याचे ठरविले आहे.
मागील सिंहस्थात पर्वणीच्या दिवशी सुमारे ५० लाख भाविकांनी हजेरी लावली होती. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गतवेळी शाही मिरवणुकीच्या मार्गावर लक्ष ठेवून असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास ऐनवेळी नेमलेल्या जागेवरून इतरत्र पाठविण्यात आले होते. अशा प्रसंगात संबंधित अधिकारी तैनात असलेल्या जागेवरील व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तालयाने प्रत्येकाला नेमून दिलेल्या जागेवर तैनात ठेवण्याचे नियोजन चालविले आहे. त्यानुसार दाखल होणारे हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी कोणकोणत्या ठिकाणी तैनात राहतील, याचे नियोजन आधीच केले जाणार आहे. सिंहस्थाच्या काही दिवस अगोदर बाहेरगावाहून कुमक येईल. त्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी ज्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होतील, त्या ठिकाणीच त्यांची रंगीत तालीम केली जाणार आहे. शाही पर्वणीच्या दिवशी पोलीस यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहील. या काळात बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी वा कर्मचाऱ्याने भोजनासाठीही आपली जागा सोडू नये, या पध्दतीने नियोजन आहे. त्यामुळे बंदोबस्तावरील हजारो पोलिसांची भोजनाची व्यवस्था जागेवर केली जाणार आहे. भोजनासाठी एखादा कर्मचारी जागेवरून हलल्यास एक ते दोन तासाचा कालावधी जावू शकतो. यामुळे हा धोका पत्करला जाणार नाही.
कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधु-महंत व भाविकांच्या गर्दीचे काळजीपूर्वक व्यवस्थापन महत्वाचे आहे. घाटावर स्नानासाठी एकाचवेळी गर्दी होऊ नये, याकरिता पोलीस यंत्रणेने आसपासच्या परिसरातील मोकळ्या जागा उपयोगात आणण्याची सूचना केली आहे. एकदम गर्दी झाल्यास भाविकांना त्या मोकळ्या जागेवर काही काळ का होईना थांबविता येईल.

पोलीस बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन
सिंहस्थ काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त १० ते १२ हजार पोलिसांची कुमक मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाहेरगावाहून ही कुमक दाखल झाल्यावर संबंधितांना ते बंदोबस्तासाठी नियुक्त होणाऱ्या जागेवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याने बंदोबस्तासाठी नेमलेले ठिकाण सोडू नये, असे नियोजन केले जात आहे. त्याकरिता संबंधितांना बंदोबस्तावरील जागेवर भोजन देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
– कुलवंतकुमार सरंगल, पोलीस आयुक्त, नाशिक