राज्यातील सिंचन घोटाळ्यात जलसंपदा मंत्री जबाबदार आहेत. घोटाळ्याच्या चौकशीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा बळी जायला नको, अशा शब्दात खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांवरच घणाघात केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील काळमावाडी कालवा खुदाईत सिंचन घोटाळ्याची पाळेमुळे रोवली गेली आहेत, असे सांगत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
खासदार मंडलिक यांनी राज्यातील सिंचन घोटाळ्यांसंदर्भात प्रसिध्दी पत्रकाव्दारे राज्य शासनावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांना मंत्री पातळीवरून प्रशासकीय मान्यता दिली जाते. त्यामुळे त्याला आजी-माजी जलसंपदा मंत्री सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर करीत दडपशाही मार्गाने अधिकाऱ्यांना यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केवळ श्वेतपत्रिका प्रसिध्द करून सिंचन घोटाळ्यातील प्रचंड गैरकारभार उघड होणार नाही. त्यासाठी प्रामुख्याने जलसंपदा मंत्र्यांच्या एकूण कारभाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे खासदार मंडलिक यांनी केली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या चौकशीचा अहवाल श्वेतपत्रिकेत समाविष्ट करण्यात यावा, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांनी राजीनामा देण्याचे मुख्य कारण सिंचन विभागाची श्वेतपत्रिका हेच आहे का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अजित पवार यांना या घोटाळ्यास जबाबदार ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. पवार चुलत्या-पुतण्याच्या परस्परविरोधी विधानाबाबत टीका करून राष्ट्रवादी हा पक्ष नसून भ्रष्टाचारांची टोळी आहे व अजित पवार हे टोळीचे सरदार असून महाराष्ट्र विकतील, अशी टीका केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील दूधगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या घोटाळ्यांचे विविध नमुनेही त्यांनी पत्रकात विशद केले आहेत.