एरवी भररस्त्यात गाडय़ा अडवून ‘ पीयूसी’ दाखवा असे दरडावून व नसल्यास दंड आकारणाऱ्या पोलिसांनी हा नियम त्यांच्या ताफ्यातील वाहनांना मात्र लावलेला नाही. त्यामुळे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाकडूनच कायद्याचे पालन होत नसल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. ठाणे पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या तब्बल ६९७ गाडय़ांपैकी एकाही गाडीची ‘पीयूसी’ तपासणीच झाली नसल्याचे पोलिसांनीच कबूल केले आहे. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी ही वस्तुस्थिती कबूल केली आहे. त्यावर प्रधान यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय या वाहनांची पीयूसी तपासणी तात्काळ करण्याची विनंतीही केली आहे.
ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहराच्या रस्त्यांवर रोजच्या रोज शेकडो वाहनांची भरही पडत आहे. या वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची गंभीर समस्या शहराला भेडसावत आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण मोजण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने प्रत्येक वाहनाची पीयूसी चाचणी केली जाते. शहरातील विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकृत पीयूसी केंद्रामधून वाहनचालकही चाचणी करतात. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत शहरामध्ये १०५ पीयूसी केंद्रे असून अशा केंद्रांतून वाहनचालक वाहनाची पीयूसी तपासणी करून घेत असतात. प्रत्येक वाहनाला पीयूसी तपासणी सक्तीची केली असून ही चाचणी नसल्यास वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सर्वसामान्यांसाठी ही प्रक्रिया असून वाहनचालकांना या प्रक्रियेतून गेल्याशिवाय गत्यंतर राहात नाही. सर्वासाठी कायदा समान असल्याचे म्हटले जात असून प्रत्येकाला ही कायद्याची चौकट पाळावी लागते. कायदा पाळत नसलेल्यांवर मात्र पोलिसांच्या वतीने कारवाई केली जाते. कायद्याचे पालन करणाऱ्या या पोलिसांच्या स्वत:च्या वाहनांची परिस्थिती मात्र खूपच वेगळी असून पोलिसांच्या ६९७ वाहनांपैकी एकाही वाहनाची पीयूसी तपासणीच झालेली नसल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. त्यामुळे कायद्याची शिकवण देणारे पोलीसच कायद्याचे पालन करत नसल्याची टीका होऊ लागली आहे.
ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या वाहनांची माहिती मागवली होती. त्यांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये ठाणे पोलिसांकडे असलेल्या एकूण वाहनांपैकी दुचाकी विभागामध्ये सीडी डाऊन, पल्सर, सिबीझेड, टीव्हीएस या कंपन्यांची एकूण ३८६ वाहने आहेत तर स्कॉर्पिओ, बोलेरो, सुमो, क्वालीस, जीप, मारूती आणि टाटा अशी मिळून ३११ वाहने आहेत. या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संपूर्ण यादी पोलिसांनी उपलब्ध करून दिली असून त्यांची पीयूसी मोटार परिवहन विभागात उपलब्ध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.