सिंहस्थ कुंभमेळा जसजसा जवळ येऊ लागला आहे, त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनावर प्रत्येकाकडून सूचनांचा भडीमार करण्यात येत आहे. मंत्र्यांसह साधू, महंत, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे नेते अशी सर्व मंडळी सूचना करण्यात अग्रेसर असून या सर्वाकडून करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन बैठकांमध्ये त्याविषयी मंथन करण्याचे काम आता स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागले आहे. काही सूचना सिंहस्थ कामांमधील त्रुटी दाखविणाऱ्या असल्याने त्यांची दखल प्रशासनाकडून घेतली जात असून सुधारणा करण्याचे निर्देश दिले जात आहेत. वाढत्या सूचना आणि सिंहस्थासाठी असणारा अल्प कालावधी या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय बैठकाही वाढल्या आहेत.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत अशीच एक बैठक त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आली. या बैठकीत सिंहस्थ कामांचा आढावा घेण्यात आला. सिंहस्थ विकास कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे आणि कामांचा दर्जा राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: कामांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील वाहनतळ, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, रस्ते दुरूस्ती, पाणी पुरवठा, स्वच्छता, साधूग्राम आणि भाविकग्राम, घाट निर्मिती आदी कामांचा सविस्तर आढावा घेतला. कामांमध्ये असलेल्या त्रुटींचीही त्यांनी माहिती घेतली. त्र्यंबकेश्वर येथील रस्त्यांची सर्व कामे १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे त्यांनी बैठकीत बजावले. रस्त्यांची कामे करताना येणाऱ्या अडचणी समन्वयाने सोडवून कामे थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाहनतळाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. साधूग्राममधील प्लॉटची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करावे. मुंबईहून येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीबाबतचे नियोजन पुढील आठवडय़ात मांडण्याचे निर्देश देतानाच उपविभागीय अधिकारी, पोलीस, आरोग्य यंत्रणा, परिवहन महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एकत्रितपणे विविध पर्यायांवर विचार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिका साधूग्राम व भाविकग्रामच्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ ठेवाव्यात. म्हणजे गर्दीच्या वेळेस आवश्यकता भासल्यास त्यांना सहजपणे मार्ग उपलब्ध होईल. वाहनतळाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था तीन ते चार ठिकाणी करावी. पाणी पुरवठय़ासाठी मार्ग आणि टँकरच्या फेऱ्या यांचेही नियोजन करण्यात यावे. एसटी वाहतुकीचे २४ आणि १२ तासांचे पर्यायी नियोजन तयार करण्यात यावे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम दर्जेदार होईल याची काळजी घ्यावी. तसेच कुंभमेळा कालावधीत जलवाहिनींची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य सुविधेसंदर्भात नियोजन करताना रुग्णवाहिका आणि पथकांची स्थान निश्चिती करावी. तीन ते पाच रुग्णवाहिकांवर एका अधिकाऱ्याचे नियंत्रण असावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महावितरणला आपत्कालीन परिस्थितीत आणि नगरपरिषदेला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत नियोजन करून ते पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगर परिषदेने छोटय़ा स्वरूपातील स्वच्छतागृहांची उर्वरित कामे त्वरित सुरू करावीत, कामाच्या दर्जाबाबत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचे संकेतही जिल्हधिकाऱ्यांनी यावेळी दिले. बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाव्दारे कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, मोक्षदा पाटील, मेळाअधिकारी रघुनाथ गावडे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.