सिंहस्थ कुंभमेळा उंबरठय़ावर येऊन ठेपला असताना शहराचे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची बदली करून त्यांच्या जागी आलेले एस. जगन्नाथन यांच्यासमोर सिंहस्थ यशस्वीपणे पार पाडण्यासह गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे. कार्यभार स्वीकारताच जगन्नाथन यांच्यावर शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने निवेदनांचा भडीमार सुरू झाला असून भीमशक्ती सामाजिक संघटनेने दिलेल्या निवेदनात शहरातील गुन्हेगारीविरोधात आक्रमक होण्यासह वाहतूक नियोजन करण्याची मागणी केली आहे.
नव्याने कोणताही शासकीय अधिकारी आला की त्याच्यापुढे मागण्या मांडण्यासाठी विविध संस्था व संघटना तयारच असतात. पोलीस आयुक्त जगन्नाथन हेही त्यास अपवाद ठरलेले नाहीत. भीमशक्ती संघटनेच्या वतीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून त्याद्वारे शहरातील एकूणच गुन्हेगारी आणि वाहतूक व्यवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांना सौजन्याने वागण्याचे तसेच ग्राहकाधिकार सांभाळण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. थांब्यावरच प्रत्येक शहर बस थांबण्यासाठी नियमावली करावी, सीबीएस, शालिमार, पंचवटी कारंजा, सातपूर बसस्थानक, सातपूर चौफुली, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, द्वारका या ठिकाणी वाढणारी गर्दी व वाहतूक समस्येचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 शहराच्या विविध भागांत चारचाकी गाडी लावून व्यवसाय करणारे पादचारी व वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यांची योग्य व्यवस्था करण्यात यावी. शहरातील टोळीयुद्धाविरोधात कठोर कारवाईची गरजही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागांत मंगळसूत्र भर दिवसा खेचण्याचे प्रकार घडत आहेत. स्त्रीधन चोरणाऱ्यांना मोक्का कायद्याअंतर्गत अटक करण्यात यावी. ज्या खुनांचा तपास लागलेला नाही, त्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, शहरातील अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यात यावी. शहरातील काही भागांत अजूनही अवैधपणे गुटखा विक्री होत असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले दाखल करावेत. हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा होण्याकरिता पोलीस यंत्रणेने पंचनाम्यात त्रुटी ठेवू नये यासाठी त्यांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
याशिवाय सिंहस्थात शहरामध्ये वाढणाऱ्या स्थानिक व परप्रांतीय भिकाऱ्यांचा आणि भुरटय़ा चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याकरिता स्वतंत्रपणे यंत्रणा उभी करण्यात यावी. शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी कमांडोची नेमणूक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जगन्नाथन यांनी शहरातील गुंडगिरी मुळापासून उखडून टाकावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर अविनाश आहेर, चंद्रकांत बोंबले, सूर्यकांत आहेर, अंजली वैद्य आदींची स्वाक्षरी आहे.