रोहयोंतर्गत गैरव्यवहारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्य़ातून नावे वगळून गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकास १४ लाख रुपयांची लाच देणाऱ्या सहाजणांना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शहराच्या क्रांती चौकातील हॉटेलमध्ये सोमवारी संध्याकाळी पकडले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
सिल्लोड तालुक्यातील मोर बुद्रुक व आन्वा या गावांमध्ये रोजगार हमी योजनेचे काम सन २०११ मध्ये सुरू होते. या कामात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने अजिंठा पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा तपास उपनिरीक्षक नामदेव मधे करीत आहेत. या गुन्ह्य़ातून आपली नावे वगळावीत, तसेच गुन्हा सी फायनल करावा यासाठी गैरव्यवहारातील अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून तपासी अधिकारी मधे यांना १४ लाखांची लाच देण्याची तयारी दाखविली होती. मधे यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार विभागाच्या पुणे येथील पथकाने सापळा लावला. क्रांती चौकातील मनोर हॉटेलात आरोपींकडून रक्कम स्वीकारल्यावर मधे यांनी पथकाला कळविले.
मोढा बुद्रुक गावचे ग्रामसेवक शरद सीताराम देशपांडे, आन्वाचे ग्रामसेवक किशोर गणपत जाधव (३५), जि. प. उपशाखा अभियंता तुळशीराम शेनफड खरात (५७, सिल्लोड), गजानन भाऊराव वाघ (तळणी), तुकाराम उत्तम नवले (२८, पिंपळगाव काजळी, जिंतूर) व सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी तेजराव श्यामराव ढगे या सहाजणांना पथकाने ताब्यात गेतले. क्रांती चौक पोलिसांत या बाबत गुन्हा नोंदविण्यात आला.