‘हसवाफसवी’ म्हणजे दिलीप प्रभावळकर या समर्थ, अष्टपैलू अभिनेत्याने आपली विचक्षण निरीक्षणशक्ती आणि नर्मविनोदाची सूक्ष्म जाण पणाला लावून कसलेल्या नटासाठी रचलेला बहुरंगी नाटय़खेळ! त्यांच्याच लेखणीतून आधी कागदावर आणि मग प्रत्यक्ष रंगमंचावर अवतरलेल्या या ‘हसवाफसवी’ने इतिहास रचला. शेकडो प्रयोगांतून देशोदेशीच्या रसिकांना ‘हसवाफसवी’ने भरभरून आनंद दिला. दिलीप प्रभावळकरांनी या नाटय़खेळाचे प्रयोग थांबविल्याला दीड दशक लोटल्यानंतर हाच खेळ पुष्कर श्रोत्री या बहुढंगी अभिनेत्यासाठी पुन्हा एकदा उभारला तो ‘जिगिषा’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांनी! चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या ‘हसवाफसवी’नेही आता प्रयोगांची शंभरी गाठली आहे. येत्या शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वा. यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलात हा शतकमहोत्सव साजरा होत आहे. वर्षपूर्वीच्या आतच शतकी प्रयोगांचा टप्पा गाठणाऱ्या या ‘हसवाफसवी’नेही आतापर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि आखाती देशांतले मैदान गाजविले आहे. या शतकमहोत्सवी सोहळ्याला मराठीतले आघाडीचे सहा विनोदी अभिनेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रशांत दामले, भरत जाधव, निर्मिती सावंत यांच्यासह आणखीन एका प्रमुख पाहुण्याचं नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. यानिमित्ताने रंगमंचावर ‘हसवाफसवी’तल्या सहा इरसाल व्यक्तिरेखा साकारत असताना प्रेक्षागृहातही विनोदाचे हे सहा एक्के उपस्थित राहण्याचा आगळावेगळा योग साधला जाणार आहे.