डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विद्युत वाहिनीत मंगळवारी रात्री आठ वाजता अचानक बिघाड झाल्याने डोंबिवली पश्चिम भागाचा वीजपुरवठा तब्बल सहा तास खंडित झाला होता. ढगाळ वातावरण, वाऱ्याने मारलेली दडी, त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रहिवाशांचे अक्षरश: हाल झाले.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज नियंत्रण कक्षाचा देवीचा पाडा येथील दूरध्वनी तब्बल पाच तास लागत नव्हता. त्यामुळे यासंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांचा संबंधित यंत्रणांशी संपर्कच होत नव्हता. मुसळधार पावसात डोंबिवली परिसरात वीज खंडित होते, असा नेहमीचाच अनुभव आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी असे कोणतेही वातावरण नसतानाही अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रहिवाशी त्रासून गेल्याचे चित्र या भागात होते. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. वीज वाहिनी जमिनीखालून जात असल्यामुळे नक्की कोठे दोष निर्माण झाला आहे, याचा शोध घेणे कर्मचाऱ्यांना अडचणीचे झाले होते. वीजपुरवठा एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर घेण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. त्यामध्येही कर्मचाऱ्यांचा बराच वेळ गेला. अखेर रात्री साडेबारा वाजता वीज प्रवाह सुरू झाला. पहाटेच्या वेळेत पुन्हा वीज प्रवाह खंडित झाला. बुधवारी सकाळी सात वाजल्यानंतर डोंबिवली पश्चिमेत पुन्हा विजेचा लपंडाव सुरू झाला. तो दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता. महावितरणचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मशाळकर यांनी सांगितले, एमआयडीसीतील भूमिगत वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. बिघाड शोधण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत विजेची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, दिवसभर सुरू असलेल्या विजेचा लंपडाव लवकरच बंद होईल, असा दावाही मशाळकर यांनी केला.