सरकारी आणि खासगी संस्थांनी अधिकाधिक युवकांना शिकाऊ उमेदवार म्हणून प्रत्यक्ष कार्यानुभव घेण्याची संधी द्यावी, असे आवाहन विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘जागतिक युवक कौशल्य दिना’चे औचित्य साधून ‘कोहिनूर’ने आयोजिलेल्या ‘कौशल्य मेला’चे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोहिनूरचे संस्थापक मनोहर जोशी, महापौर स्नेहल आंबेकर, अध्यक्ष उन्मेष जोशी, संस्थेचे संचालक समीर जोशी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून संस्थेतर्फे तरुणांना विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी तंत्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते.
सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून जग आपल्या कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी भारताकडे पाहत आहे. या संधीचा लाभ भारताने घेतला पाहिजे. आपल्याकडे अभियांत्रिकींची संख्या विपुल आहे. मात्र, प्लंबर, सुतार यांसारख्या छोटय़ामोठय़ा कारागिरांची संख्या अतिशय कमी आहे. याकडे लक्ष देऊन युवकांना प्रशिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
देशातील सुमारे ७५ टक्केग्रामीण जनता केवळ शारीरिक श्रमाची कामे करण्यास सक्षम आहेत. परंतु, त्यांच्याकडे कुठलेही कौशल्य नाही. या मोठय़ा वर्गाला कौशल्य शिक्षण दिल्यास तो देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान देऊ शकेल, असे राज्यपालांनी सांगितले.