घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी किरकोळ बाजारात मात्र दरांची दांडगाई अजूनही कायमच असल्याचे चित्र दिसत आहे. किरकोळ बाजारात सुरूअसलेल्या दरांच्या दांडगाईला आवर बसावा यासाठी राज्य सरकारने मुंबई, ठाण्यात स्वस्त भाजी केंद्र सुरू करण्याची मलमपट्टी मंगळवारपासून सुरू केली. त्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारांमधून सुमारे ११ हजार किलो भाजीपाला या केंद्रांवर पाठविण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यातील लोकसंख्येचा आवाका लक्षात घेता या तुरळक केंद्रांना घाबरून किरकोळ विक्रेते भाज्या स्वस्त करतील का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सरकारची केंद्रे सुरू होत असूनही त्याची कोणतीही पर्वा किरकोळ विक्रेत्यांना दिसत नव्हती. मंगळवारी उशिरापर्यंत किरकोळ बाजारात तेजीचा माहोल संचारला होता.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून वाशीतील घाऊक बाजारापेठेत भाज्यांची चांगली आवक सुरू झाली आहे. सोमवार, मंगळवार अशा सलग दोन दिवशी पुणे तसेच नाशीक जिल्ह्यातून भाजीपाल्याने भरलेल्या सुमारे एक हजार गाडय़ा या बाजारांमध्ये दाखल झाल्या. त्यामुळे भाज्यांचे घाऊक दर कमी होण्यास सुरुवात झाली. कोबी (८ रुपये), फ्लावर (८ ते १२ रुपये), वांगी (१६ ते २२ रुपये), टॉमेटो ( २८ ते ३४), भेंडी (३२) अशा सर्वच भाज्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजीपाला बाजाराचे उपसचिव अविनाश पाटील यांनी पत्रकारांना दिली. येत्या पंधरवडय़ात हे दर आणखी कमी होतील, असा दावाही पाटील यांनी केला. घाऊक बाजारात आठवडाभरापूर्वी १२० ते १४० रुपयांनी विकले जाणारे उत्तम प्रतीचे आले मंगळवारी ८० ते ९५ रुपयांनी विकले जात होते. हिरवी मिरची (१६ ते २२), काकडी ( ८ ते १२), ढोबळी मिरची ( ३० ते ४०) अशा भाज्यांच्या किमतीही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत, अशी माहिती भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर िपगळे यांनी दिली.
किरकोळ बाजार मात्र तेजीत
राज्यभरातून मुंबईस होणारी भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी किरकोळ बाजारात मंगळवारी उशीरापर्यंत तेजीचा माहोल कायम दिसून येत होता. टॉमेटो (६० ते ७०), कोबी (२८ ते ३२), फ्लॉवर (४०), भेंडी (६०) अशा सर्वच भाज्या अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात होत्या. सर्वसामान्य ग्राहकांचा किरकोळ बाजाराशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे या बाजारावर नियंत्रण येणे आवश्यक आहे, अशी मागणी नवी मुंबई ग्राहक मंचाचे पदाधिकारी भूषण कांबळे यांनी वृत्तान्तला दिली. स्वस्त भाजी विक्रीची १०-१२ केंद्रे सुरू करून मूळ दुखणे मिटणारे नाही, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

आणखी १०० स्वस्त केंद्रें सुरू करणार  
दरम्यान, सरकारच्या आदेशानुसार मंगळवारी दुपापर्यंत सुमारे ११ हजार किलो भाजीपाला स्वस्त भाजी विक्री केंद्रांमध्ये रवाना करण्यात आला, अशी माहिती पिंगळे यांनी दिली. एपीएमसीने या भाज्यांचे दरपत्रक निश्चित केले असून त्यानुसार अशा स्वस्त भाजी विक्री केंद्रात विकल्या जाणाऱ्या एकाही भाजीची किंमत ४० रुपयांपेक्षा अधिक नाही, असा दावा िपगळे यांनी केला. संपूर्ण मुंबई, ठाण्यासाठी अवघी ११ केंद्रे पुरेशी पडतील का, या प्रश्नावर उत्तर देणे त्यांनी टाळले. यापुढील टप्प्यात तब्बल १०० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही केंद्रे सुरू झाल्यावर किरकोळ बाजारावर चाप बसू शकेल, असेही ते म्हणाले.