नाशिक, पुणे, नवी मुंबईतील दलालांनी संगनमताने केलेल्या साठेबाजीमुळे कांद्याचे भाव गगनाला भिडू लागले असल्याची बाब सोमवारी एपीएमसी बाजारात व्यापाऱ्यांनी केलेल्या कृत्रिम दरवाढीमुळे स्पष्ट झाली. सकाळी आठ वाजता ६२ रुपये किलोने असलेल्या कांद्याकडे ग्राहकाने पाठ फिरवल्याचे दिसताच व्यापाऱ्यांनी कांदा ५२ ते ५६ रुपये प्रती किलोने विकला. त्यामुळे ही भाववाढ दलालांनी केल्याचे दिसून येत आहे. बाजारात कांद्याची आवक वाढू लागल्याने शनिवापर्यंत कांद्याचे दर कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 त्यात बंगळुरू येथील बाजारात स्थानिक कांदा येऊ लागल्याने बंगळुरू येथे कांदा पाठविण्याची यानंतर गरज पडणार नाही. याऊलट बंगळुरूयेथून दहा-बारा गाडय़ा एपीएमसी बाजारात येण्याची शक्यता आहे.राज्यातील दुष्काळजन्य स्थिती लक्षात घेऊन काही दलालांनी नाशिक-पुणे येथील कांदा खरेदी करून साठवून ठेवला आहे. पावसाळ्यात या कांद्याचे चांगले पैसे करता येतील हा त्यामागचा उद्देश होता. दुष्काळामुळे मे महिन्यात कांद्याची लागवड करता आली नाही आणि पावसाळ्यातील तुटवडय़ाला सुरुवात झाली. त्यामुळे मागणी आणि पुरवठय़ाचे समीकरण कोलमडून गेले आणि कांद्याने सत्तरी गाठली. कमी उत्पादन हे भाववाढीचे प्रमुख कारण असले तरी त्याआड दलालांनी कांद्याची केलेली साठेबाजी हेही एक कारण आहे. त्यामुळे कृषिमंत्री शरद पवार यांनी कांद्याची भाववाढ ही कृत्रिम असल्याचे विधान केले. ही बाब एपीएमसीच्या सोमवार बाजारात स्पष्ट झाली. बाजारात १०८ ट्रक कांदा आला. त्यामुळे भाव कमी होणे क्रमप्राप्त होते. एपीएमसीच्या बाजारात सरासरी १२५ ते १५० ट्रक कांदा दररोज येतो आणि तो मुंबईसह जवळच्या शहरांची गरज भागवतो. गतवर्षी जुलै महिन्यात दोन हजार ७३५ ट्रक कांदा बाजारात आला होता. यावर्षी तो ३०० ट्रकने कमी आला आहे. त्यामुळे भाववाढ इतकी होण्याची आवश्यकता नव्हती. सोमवारपासून कांद्याची आवक वाढू लागली आहे. दलालांनी चाळी, बराकीमधून लपवून ठेवलेला कांदा बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे. साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा सरकारमधील घटकांनी दिल्याने या साठेबाज व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शनिवापर्यंत कांद्याचे भाव घाऊक बाजारात ४० ते ४५ रुपये प्रती किलोने खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो किरकोळ बाजारात आत्तापेक्षा थोडा स्वस्त मिळू शकणार आहे. त्यात कर्नाटकसाठी बंगळुरूच्या बाजारात जाणारा कांदा नंतर पाठविण्याची गरज पडणार नाही. त्या ठिकाणी तेथील स्थानिक कांदा आता बाजारात येऊ लागला असल्याचे कांदा बाजार संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले. कांद्याच्या कमी उत्पादनामुळे कांद्याचा वांदा सुरू झाला आणि त्यानिमित्ताने दलालांनी आपला धंदा केला.