नगरच्या सरकारी रूग्णालयाची अनास्था व पोलिसांच्या बेफिकिरीमुळे दलित महिला अत्याचार प्रकरणी तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे तीन दिवस महिलेवर कुठले उपचार करण्यात आले, त्याचा तपशिलही तपासी अधिकाऱ्यांना मिळू शकला नाही. एका गंभीर गुन्ह्याच्या तपासाचा प्रवास हा अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. दरम्यान शहरातील या प्रकरणातील आणखी दोघा आरोपींना आज अटक करण्यात आली.
घटनेतील प्रमुख आरोपी अमन आयुब शेख (वय १९) व सलिम इब्राहिम कुरेशी (वय २८) या दोघांना आज अटक करण्यात आली. त्यांना दि. १९ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्यात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सुलेमान युसूफ शेख, शरिफ लतिफ शेख व चंद मोरे या आरोपींना गुन्ह्यातून वगळावे म्हणुन पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. दोघा आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. आणखी काही आरोपी फरार असून त्यांचा शोध अजुनही सुरूच आहे.
शुक्रवार दि. २२ फेब्रुवारी रोजी महिला अत्याचाराचे प्रकरण घडले. शनिवार दि. २३ रोजी महिलेने जिवाच्या भितीने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. गळनिंब येथे नातेवाईकांकडे थांबून नंतर कोल्हारहून नगरला गेली. तेथे रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या एका नातेवाईकाने तिला नगरच्या सरकारी रूग्णालयात दाखल केले. तब्बल तीन दिवस तिने तेथे उपचार घेतले. नगरच्या पोलिसांनी ही घटना शहर पोलिसांना कळविली नाही. त्यानंतर दि. २६ रोजी पोलिस बंदोबस्तात महिलेला शहर पोलिस ठाण्यात आणून फिर्याद घेण्यात आली. त्यानंतर नगर येथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता तपास पोलिस उपअधिक्षक अंबादास गांगुर्डे करीत आहेत.
पहिले तीन दिवस नगरच्या सरकारी  रुग्णालयात काय उपचार झाले, याचा तपशील अद्याप त्यांच्याकडे आलेला नाही. नगर पोलिसांनी आम्हाला माहिती दिली नव्हती असे ते सांगतात. तर नगर पोलिस सर्व माहिती श्रीरामपूर पोलिसांना दिली असा खुलासा करतात. नगरच्या रूग्णालयाच्या नेमणुकीवर असलेले पोलिसही बेफिकीर होते. घटना घडल्यानंतर ४८ तासांच्या आत वैद्यकीय तपासणीत महत्वाचे पुरावे मिळतात. पण गलथान कारभारामुळे असे पुरावे पोलिसांना मिळू शकलेले नाही.