अपक्ष नगरसेवक गुलमीर खान यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एच. हाश्मी यांना श्रीमुखात भडकावून त्यांचे कपडे फाडल्याचा प्रकार शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील शिवाजी पुतळ्याजवळ घडला.
शहर वाहतूक शाखेच्या वतीने शुक्रवारपासून वाहन तपासणी मोहीम सुरू असून वाहनधारकांकडून १७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शनिवारी शिवाजी पुतळ्याजवळ हाश्मी व त्यांचे सहकारी वाहनांची तपासणी करीत असताना नगरसेवक खान यांच्या भावाची दुचाकी पकडली. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही, अशी तंबी पोलिसांनी दिली म्हणून भावाने खान यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. खान तातडीने शिवाजी पुतळ्याजवळ पोहोचले व हाश्मी यांना शिवीगाळ करीत गचांडी धरली तेव्हा हाश्मी यांचे सहकारी गुलमीर खान यांच्या अंगावर धावून गेले. खान यांनी हाश्मी यांना तोंडावर बुक्के मारले व शर्टही फाडला. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिकेतील भगवान वाघमारे, दिलीप ठाकूरसह सर्वपक्षीय नगरसेवक घटनास्थळी पोहोचले. या सर्व स्थितीत बराच गोंधळ वाढत गेला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या दालनात नगरसेवक व पोलीस अधिकाऱ्यांत गुन्हा दाखल करावा किंवा नाही, यावर तब्बल चार तास काथ्याकूट चालू होता. अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्यात हाश्मी यांच्या तक्रारीवरून नगरसेवक गुलमीर खान यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत असताना असे प्रकार घडले, तरीही जिल्ह्य़ात आम्ही आमचे कर्तव्य चोख पार पाडू, असे अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. शहर वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी ही पोलिसांएवढीच महापालिकेचीही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.