जुन्या पुलावर सरकता जिना बसवून उद्घाटनाचे सोपस्कर पार पाडण्याची घाई झालेले रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रवाशांचे नव्हे, तर फेरीवाल्यांचेच हित जोपासले असल्याचा आरोप उपस्थित रेल्वे प्रवाशांनी केला आहे. नव्या पुलावरच्या मोकळ्या जागेवर सध्या फेरीवाल्यांनी आपले हातपाय पसरले असून नव्या पुलाला सरकते जिने जोडले असते तर त्या जागेवरून फेरीवाल्यांना कायमचे उठवावे लागले असते. हे होऊ नये म्हणूनच नव्या ऐवजी जुन्या पुलावर सरकते जिने बसवून रेल्वे प्रशासने फेरीवाल्यांचे हित जपले. लोकप्रतिनिधींनीही याकडे केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याची टीका कल्याणमधील रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
ठाणे, डोंबिवली पाठोपाठ कल्याण स्थानकात सरकते जिने बसवल्याचा आनंद मानावा की, चुकीच्या जागी सरकते जिने बसवले याचे दु:ख करायचे अशी प्रवाशांची द्विधा अवस्था झाली होती. विस्तृत जागा आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असणाऱ्या भागात सरकते जिने आवश्यक असताना रेल्वे प्रशासनाने नेमके उलटे करून प्रवाशांचा भ्रमनिरास केला आहे. कल्याण स्थानकात नव्याने उभारण्यात आलेला पादचारी पुल रुंद असून त्यावरील  मोकळी जागा फेरीवाल्यांनी व्यापली आहे. सरकत्या जिन्यांसाठी हिच जागा अत्यंत योग्य असल्याचा दावा प्रवासी संघटनांनी केला आहे. केवळ फेरीवाल्यांना तेथून हटवावे लागेल आणि आपले अर्थपूर्ण संबंध बिघडतील म्हणूनच रेल्वे अधिकाऱ्यांनी जुन्या पुलाला जिने जोडून काम उरकून घेतले असा आरोप प्रवासी उघडपणे करीत होते. ठाणे, डोंबिवलीमध्ये सरकत्या जिन्याच्यावेळी प्रत्येक कामाकडे लक्ष ठेवून असलेल्या लोकप्रतिनिधींनी कल्याणच्या सरकत्या जिन्यांकडे दुर्लक्ष का केले? असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला आहे. केवळ फेरीवाल्यांच्या हिताची काळजी असलेली ही मंडळी प्रवाशांसाठी नव्हे तर फेरीवाल्यांसाठीच रेल्वे चालवते की काय अशीही शंका उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
स्कायवॉक फेरीवाले मुक्त करू!
स्कायवॉकच्या अतिक्रमणाविषयी आत्तापर्यंत अनेकदा संभ्रम होतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई केली जात नव्हती. मात्र कल्याणच्या रेल्वे जागेतील स्कायवॉकची जबाबदारी नुकतीच आमच्याकडे आली असून आम्ही स्कायवॉक फेरीवाले मुक्त करू अशी प्रतिक्रिया आरपीएफचे अलोक बोहरा यांनी सांगितले.
फेरीवाल्यांकडे कायमच दुर्लक्ष..!
प्रवासी संघटना आग्रहीपणे या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी करत होते. मात्र रेल्वे प्रशासन, पोलीस आणि महापालिकेनेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधी निष्क्रयपणे प्रवाशांची गैरसोय पाहत असतात. कल्याण स्थानकात मोकळ्या जागा प्रत्येक वेळी फेरीवाल्यांनी घेरलेल्याच असतात. गुरुवारी उद्घाटनाच्या दिवशी मात्र त्यांना या भागातून दूर ठेवले होते.
राजेश घनघाव, कल्याण कसारा प्रवासी संघटना
चुकीला पाठीशी घालण्याचा प्रकार..!
रेल्वे प्रशासन चुकीचे निर्णय घेत असताना अशा चुका दाखवून देण्याऐवजी लोकप्रतिनिधी केवळ श्रेयासाठीच गर्दी करत असल्याचे गुरुवारी चित्र होते. रेल्वे प्रशासनाला या चुकीच्या कामाचा जाब विचारण्याचे सोडून या कामाचे कौतुक करण्यातच लोकप्रतिनिधी दंग आहेत, हेही तितकेच चुकीचे आहे.
मधू कोटीयन , उपनगरीय प्रवासी संघटना