News Flash

मिठीवरील पुलांच्या कामांची कूर्मगती

मुसळधार पावसात मिठीला महापुराची मगरमिठी पडू नये यासाठी नदीवरील चार विद्यमान पुलांचा विस्तार आणि एक नवा पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

| March 1, 2013 12:18 pm

मुसळधार पावसात मिठीला महापुराची मगरमिठी पडू नये यासाठी नदीवरील चार विद्यमान पुलांचा विस्तार आणि एक नवा पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र कासवगतीने सुरू असलेल्या कामांमुळे आतापर्यंत केवळ एकाच पूल उभा राहू शकला असून तीन पुलांच्या कामास मुदतवाढ देण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
२६ जुलै २००५ रोजीच्या प्रलयंकारी पावसाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेल्या चिंतनानंतर मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोली वाढविण्याचे काम हाती घेण्यात घेण्यात आले. त्याचबरोबर मिठी नदीवर सीएसटी रोड, कुर्ला-कलिना, क्रांतीनगर, आणि बामनदाय पाडा येथील पुलांची लांबी-रुंदी वाढविण्याचे काम पालिकेने सुरू केले. तसेच अशोक नगर येथे नवा पूल उभारण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी सुमारे ५१.०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही कामे पालिकेने तातडीने हाती घेतली. परंतु आजवर केवळ क्रांतीनगर पुलाचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. ३४.२५ मीटर लांबी आणि ८.३५ रुंदीचा हा पूल आता १०२ मीटर लांब आणि १२.५० मीटर रुंद झाला आहे.
कुर्ला-कलिना, बामनदाय पाडा पुलांचे विस्तारीकरण सुरू आहे. ही कामे अनुक्रमे २०१० व २०११ मध्ये पूर्ण होतील अशी पालिकेला अपेक्षा होती. परंतु संथगती कामामुळे ही कामे नियोजित वेळेत पूर्ण होणे अशक्य आहे. परिणामी दोन्ही पुलांच्या कामांना प्रत्येकी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अशोक नगर पूल २०११ मध्ये पूर्ण होईल असा अंदाज पालिकेने व्यक्त केला होता. परंतु आता या पुलाच्या कामाला २०१४ पर्यंत मुदतवाढ द्यावी लागली आहे. तर सीएसटी पुलाची विटही अद्याप पालिकेने चढविलेली नाही. या पुलाच्या कामासाठी आताशी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कुर्ला-कलिना पुलाच्या कामास अपुरी जागा आणि अशोक नगर व बामनदाय पाडा पुलाबाबत सीडब्ल्यूपीआरएसकडून अभिप्राय मिळण्यास झालेला विलंब आदी कारणांमुळे या कामांना उशीर झाला, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.
सीएसटी पुलाची लांबी १०० मीटर आणि रुंदी ४५ मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु या कामाला मुहूर्तच सापडलेला नाही. सध्या या पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम केव्हा सुरू होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. समाजसेवक अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीमुळे मिठी नदीवरील पुलांची कामे कूर्मगतीने सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2013 12:18 pm

Web Title: slow work of bridge on mithi river
टॅग : Development,Mithi River
Next Stories
1 म्हाडाच्या ‘भाग्यवानां’ना ‘ओसी’ची लॉटरी कधी लागणार?
2 सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलण्याची मराठी माणसाला शरम वाटते – अरूण साधू
3 मल्लखांबपटूवरील उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
Just Now!
X