जग हे दुखी आणि पीडितांचे आहे हे जवळून पाहता आणि अनुभवता आल्यामुळे सिनेसृष्टीचे ग्लॅमर असले तरी त्यात रमलो नाही. चित्रपट  हे खूप छोटे आणि खोटे जग आहे, असे मनोगत प्रसिध्द अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी सोलापुरात ‘प्रिसीजन गप्पा’ मध्ये मांडले.
    शिवछत्रपती रंगभवनात प्रिसीजन फाऊंडेशनने आयोजिलेल्या ‘प्रिसीजन गप्पां’ ची सुरुवात अभिनेते अमरापूरकर व लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या दिलखुलास गप्पांनी झाली. प्रिसीजन कॅम्शाफ्ट लि. चे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा व प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून गप्पांना प्रारंभ झाला.     
यावेळी ३० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रनाटय़सृष्टीत खर्च करून एकापेक्षा एक दमदार अभिनय केलेल्या सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या कारकिर्दीबद्दलचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. डॉ. अनिल अवचट यांनी अमरापूरकर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत त्यांना बोलते केले. आपले पहिले नाटक ‘हॅन्डस् अप’ पासून ते पहिला चित्रपट ‘अर्धसत्य’ ते अलीकडच्या ‘सडक’ अशा विविध नाटक व चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना आलेले अनुभव कथन करीत अमरापूरकर यांनी ‘अर्धसत्य’ मुळे जीवनात मोठा बदल झाला. विशेषत विजय तेंडुलकरांच्या नाटकामधून कामे करताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनामधून बरेच काही शिकायला मिळाल्याचा अनुभवही अमरापूरकर यांनी सांगितला. या गप्पांमध्ये सोलापुरचे रसिक रमून गेले होते.