दहीहंडीची उंची आणि आयोजकांवर घातलेल्या र्निबधांवरून दहीहंडी समन्वय समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मोठय़ा आणि लहान गोविंदा पथकांमध्ये दरी वाढू लागली आहे. मोठय़ा बक्षिसाच्या आमिषापोटी उंच दहीहंडीच्या स्पर्धेत उतरणाऱ्या मोठय़ा गोविंदा पथकांनी घेतलेल्या निर्णयात साथ करायची की दरवर्षी प्रमाणे केवळ आपल्या विभागात दहीहंडी फोडून उत्सव साजरा करायचा, असा पेच छोटय़ा गोविंदा पथकांना पडला आहे.
मुंबईतील चाळी, छोटय़ा गल्ल्यांमधून दरवर्षी मोठय़ा संख्येने लहान गोविंदा पथके निघतात. दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटायचा इतकाच या पथकांचा उद्देश असतो. काही गोविंदा पथके सामाजिक, पौराणिक विषयावर चित्ररथ साकारून त्याद्वारे जनजागृतीचे कार्यही करीत असतात. ही पथके कोणत्या मार्गाने जाणार हे वर्षांनुवर्षे ठरलेले असते. या मार्गातील मित्रमंडळी, हितचिंतकांकडून पथकांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते. या दहीहंडय़ा फोडत संध्याकाळी उत्सवाचा समारोप केला जातो. उंच दहीहंडी फोडण्यात या पथकांना अजिबात रस नसतो. त्यामुळे चार-पाच थराची दहीहंडी फोडून मिळेल ती बिदागी घेऊन ही पथके  आनंदात उत्सव साजरा करतात.
न्यायालय आणि राज्य सरकारने घातलेल्या र्निबधांचा या पथकांवर फारसा परिणाम झालेला नाही. ही पथके मुळातच चार-पाच थराची दहीहंडी फोडतात. म्हणजे पूर्वीपासूनच ते २० फूट उंचीचा नियम स्वत:हून पाळत आले आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे मित्र अथवा हितचिंतक एखादी दहीहंडी बांधतात. उत्सव आयोजकांप्रमाणे तेथे धामधूमही नसते. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमांचे पालन करीतच या पथकांना उत्सव साजरा करणे शक्य आहे.
मात्र राज्य सरकारने घातलेल्या र्निबधांचा फेरविचार करावा अन्यथा उत्सव साजरा करण्यात येणार नाही, असा इशारा दहीहंडी समन्वय समितीने दिल्यामुळे ही छोटी पथकेही संभ्रमात पडली आहेत. मोठय़ा पथकांना साथ द्यायची की आपण दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करायचा असा पेच या पथकांपुढे पडला आहे.
दहीहंडी समन्वय समितीकडे मुंबईतील सुमारे एक हजारांहून अधिक पथकांनी नोंदणी केली आहे. यातील बहुतांश पथके सात-आठ थराची दहीहंडी फोडतात. समन्वय समितीच्या सदस्यांची संख्या लक्षात घेता आपण काय करायचे, उत्सव साजरा करताना अपघात झाला तर समन्वय समिती पाठीशी उभी राहणार नाही, अशी भीतीही या पथकांना वाटत आहे. त्यामुळे उत्सव साजरा करायचा की मोठय़ा पथकांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्सवदिनी गप्प बसायचे, असे प्रश्न छोटय़ा पथकांतील पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहेत.