पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळत असते. त्यातून गुन्हे उघडकीस येतात आणि तपासही लागतो. पण पोलिसांच्या एका खबऱ्याच्या दहा वर्षांच्या भाच्याने पोलिसांना अनपेक्षितपणे मदत केली आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील पहिली अटक झाली. गणेश उर्फ कोंबडी असे या छोटय़ा खबरीचे नाव आहे. महालक्ष्मी मिलमध्ये गेल्या गुरुवारी छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपी अज्ञात होते. पण ते स्थानिक असल्याचा पहिला धागा पोलिसांना मिळाला. त्यावरून आरोपींची रेखाचित्रे रेखाटून पोलिसांनी या परिसरात शोध सुरू केला. लहान मुलांकडून माहिती मिळते असा पोलिसांचा अनुभव आहे. त्यावेळी या भागातील एका खबऱ्याने पोलिसांना आपल्या गणेश नावाच्या भाच्याबद्दल माहिती दिली. हा खबरीसुद्धा सराईत गुन्हेगार आहे.आपला दहा वर्षांच्या भाच्याकडून काही माहिती मिळेल असा अंदाज त्याने पोलिसांकडे व्यक्त केला आणि गणेशला घेऊन तो पोलिसांकडे आला. गणेशने मग या टोळक्याबद्दल माहिती दिली. ते कुठे असू शकतात, काय करतात याची माहिती दिली. त्यानेच आरोपी चांदबाबू सत्तार शेख याचे घर दाखविले. त्यावरून पोलिसांनी अवघ्या काही तासातच चांदबाबूला राहत्या घरातून अटक केली. पण तोपर्यंत इतर आरोपी फरार झाले होते. गणेशने शाळा सोडली होती. आई आणि बहिणीसोबत तो रहातो. त्याची आई घरकाम करते. शक्ती मिल परिसरात अड्डा जमविणाऱ्या या आरोपींबरोबर तो अधूनमधून असायचा. ते त्याला छोटी-मोठी कामे सांगत. त्या बदल्यात त्याला पैसे आणि खायला मिळायचे. घटनेनंतर आरोपींनी याच गणेशला पैसे देऊन कपडे लपविण्यास सांगितले होते. गणेशमुळेच या आरोपींची माहिती मिळू शकली आणि पुढचा तपास होऊ शकला असे आग्रीपाडा पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी एका महत्त्वाच्या प्रकरणात मदत करणारा अवघ्या दहा वर्षांचा गणेश पोलिसांचा ‘छोटा खबरी’ बनला आहे.