दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयातील स्माईल ट्रेन उपक्रमाद्वारे दुभंगलेले ओठ व टाळूवरील दोन हजारावर शस्त्रक्रियांचा टप्पा यशस्वीपणे पार पडला. वैद्यकीय उपक्रमातील हा एक उच्चांक असल्याचा दावा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. सी.गोयल यांनी केला. स्माईल ट्रेन उपक्रमाअंतर्गत दुभंगलेले ओठ व टाळूवरील शस्त्रक्रियेद्वारे या अवयवांचे सुघटन केल्या जाते.

देशातील कुठलाही रूग्ण या उफक्रमाचा लाभ घेऊ शकतो. आतापर्यंत सावंगीत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक या राज्यातील रू ग्णांनी लाभ घेतला आहे. विशेष बाब म्हणजे गत फे ब्रुवारीत मुखरोग शल्यचिकित्सक डॉ.राजीव बोरले यांच्या नेतृत्वातील रूग्णालयाच्या चमूने बांगलादेशात अशा १०६ शस्त्रक्रिया केल्या होत्या.     
हा उपक्रम अमेरिकेतील स्माईल ट्रेन प्रकल्पाअंतर्गत २००७ पासून सावंगीला चालविला जात आहे. फाटलेले ओठ आणि टाळू यामुळे जगभरात अनेक लोक विकलंगांप्रमाणे जीवन जगत आहेत. त्यांच्या चेहेऱ्यात विकृती निर्माण झाल्याने समाजात वावरताना त्यांना अनेकदा चेहरा लपवून वावरावे लागते. ‘स्माईल ट्रेन’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांनी हजारो लोंकांच्या ओठांवर नवे हास्य फुलविले आहे. या उपक्रमातील दोन हजारावी शस्त्रक्रिया आदिलाबाद (आंध्रप्रदेश) येथील साहील विट्ठल पोहणकर या पाच वर्षीय बालकावर करण्यात आली. यानिमित्ताने साहिलसह त्याच्या मातापित्यांचा दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे सल्लागार डॉ.वेदप्रकाश मिश्रा व संचालक सागर मेघे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. साडी-दुपट्टा तसेच शालोपयोगी सर्व वस्तू भेटस्वरूपात पोहणकर कुटूंबास देण्यात आल्या.