पावसाळा तोंडावर आला असून अशात वादळवारे, गारपीट, जोरदार वृष्टी यामुळे वीज तारा तुटतात, खांब कोसळतात, सव्‍‌र्हिस लाईनवर झाडेही कोसळतात, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. ग्राहकांना पावसाळ्यात याचा फटका बसू नये, यासाठी एसएनडीएलने विशेष मोहिमे अंतर्गत खबरदारी घेणे सुरू केले आहे.
एसएनडीएलने सुरू केलेल्या मोहिमेत विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात वीज खांब नीट केले जात आहेत. ट्रान्सफार्मरची योग्य देखभाल केली जात आहे. त्यामुळे उत्तम प्रकारचा वीज पुरवठा करता येणार आहे. एसएनडीएलने यंदाच्या पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणून मान्सूनपूर्व खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. सोबतच येत्या पावसाळ्यात ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्यासाठी योग्य अवजारांसह माणसे तयार ठेवण्यात येणार आहेत. वादळ वारे, पावसात देखभाल आणि कार्यकारी चमू सज्ज राहणार आहे. एसएनडीएलची चमू सध्या उंच वाढलेली झाडे छाटत आहे. गर्दी असलेल्या भागात सव्‍‌र्हिस लाईनची सुरक्षा तपासली जात आहे. विजेचे काम मजबूत आहे की नाही हेही तपासले जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात होणारे अपघात टळतील. दीर्घ पल्ल्याच्या सव्‍‌र्हिस लाईन्स असलेल्या भागात नवे ट्रान्सफार्मर बसवण्यात येत आहे. त्यामुळे फ्यूज जाण्याचे प्रकार थांबवता येतील. गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात शहरात पावसाने थैमान घातले होते अशाही स्थितीत एसएनडीएलने ९९ टक्के सेवा दिली आहे. यंदा अगदी शंभर टक्के सेवा देण्याचा मानस असल्याचे एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा म्हणाले. एसएनडीएलच्या ग्राहकांना चोवीस बाय सात मदत केंद्रासह कॉल सेंटरची सेवा आहे. ते चोवीस तास मदत केंद्रातील क्रमांक ६६६०००० वर तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात किंवा एसएमएस करू शकतात.