नागरिकांना सेवा देण्यात कुचराई करीत असेल तर एसएनडीएलची फ्रँचाईझी समाप्त केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.
आमदार विकास कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रवीण दटके, महापालिकेचे सत्ता पक्षनेते दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, रश्मी फडणवीस, सतीश होले, अ‍ॅड. संजय बालपांडे आदी सर्व नगरसेवक, भाजपचे मध्य नागपूर अध्यक्ष विलास त्रिवेदी, अमोल ठाकरे, किशोर पलांदूरकर आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय दळववळण मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले. नागपूर शहरातील गांधीबाग, महाल व सिव्हिल लाईन्स भागात वीज पुरवठय़ाची फ्रँचाईझी १ मे २०११ रोजी स्पँकोला देण्यात आली होती. जून २०११ मध्ये अतिवृष्टी झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. स्पँकोच्या हलगर्जीपणामुळे तो सुरू होण्यास सात दिवस लागले. नागरिकांचे अतोनात हाल झाले. जून २०१२ मध्ये स्पँकोने महावितरणला विश्वासात न घेता परस्पर एसएनडीएल कंपनीला फ्रँचाईझी दिली. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एक कर्मचारी व एक नागरिक विजेचा धक्का लागून तर विजेचा खांब डोक्यावर पडल्याने एक नागरिक मरण पावला.
कंपनीजवळ पुरेशी यंत्रणा आणि दुरुस्तीची साधनेही नाहीत. केव्हाही वीज पुरवठा खंडित होतो आणि दुरुस्तीस विलंब केला जातो. वीज पुरवठा खंडित झाल्याची सूचना देण्यासाठी ग्राहकांना प्रचंड त्रास होतो. कंपनीने जबरदस्तीने विजेचे सदोष मीटर ग्राहकांच्या माथी मारले. वीज तपासणीसाठी अपरात्री अधिकारी जाऊन त्रास व धमक्या देतात. थकित देयकांची वसुली बॉक्सर वा गुंडांकरवी केली जाते.
दोन दिवसांपूर्वी अचानक वीजपुरवठा खंडित करून कंपनीचे कर्मचारी संपावर गेले. या कंपनीत सावळा गोंधळ सुरू असून तिच्याकडून काम काढून घ्या आणि महावितरणला सोपवा, अशी स्पष्ट मागणी कालच चौकशी समितीला करण्यात आल्याचे गडकरींच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आमदार आणि ऊर्जा मंत्र्यांचेही कंपनी ऐकत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. स्पँको वा एसएनडीएलबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढतच असून नागरिकांना सेवा देण्यात कुचराई करीत असेल तर एसएनडीएलची फ्रँचाईझी समाप्त केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.