News Flash

‘स्पंदन’चे सामाजिक भान!

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २००५ मध्ये एकत्र आलेल्या तरुणांनी आपली संवेदनशीलता कायम ठेवत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील गुणवंत

| January 2, 2014 09:08 am

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २००५ मध्ये एकत्र आलेल्या तरुणांनी आपली संवेदनशीलता कायम ठेवत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याची परंपरा स्पंदन या संस्थेद्वारे कायम ठेवली आहे. या उपक्रमासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने दरवर्षी दोन दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात. येत्या ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाटय़गृहात ‘साज’ या गाणाऱ्या वाद्यांची विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये राहणारे स्पंदन संस्थेचे कार्यकर्ते सुरुवातीच्या काळात आपल्या खिशातून मदत निधी जमा करत होते. पुढे या उपक्रमात कल्याणमधील नागरिकांचाही हातभार असावा या उद्देशाने गाण्यांच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात करण्यात आली. हा कार्यक्रम दर्जेदार तितकाच तो कल्याणच्या रसिकांसाठी पूर्णपणे नवा असावा याची काळजी या कार्यकर्त्यांनी पहिल्यापासूनच घेतली.
त्यामुळे अनेक कार्यक्रमांचा प्रारंभ स्पंदनच्या व्यासपीठावरून झाला. आयुष्यावर बोलू काही, यशवंत देवांचे देवगाणी, मूर्तिमंत अस्मिता- स्मिता पाटील, मंगेश पाडगावकरांचा माझे जीवन गाणे, अनप्लग्ड मदन मोहन तर मागच्या वर्षी एसडी आणि आरडी बर्मन यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणारी मैफल आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमातून संकलित होणारा निधी गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रामुख्याने शिष्यवृत्तीच्या रूपाने देण्यात येतो. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्यकर्ते मुरबाड येथील बांदलपाडा आदिवासी शाळा, चिचळा आदिवासी शाळा, मधुरम चॅरिटेबल ट्रस्ट जुम्मापट्टी येथील वसतिगृह अशा संस्थांना विविध वस्तूंची मदत करत असतात.
या उपक्रमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मदतीने दोन विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगचा अभ्यास पूर्ण केला आहे.
‘साज’ अर्थात गाणारी वाद्ये या मैफलीत पियानो, व्हायोलिन्स, सितार, मेंडोलिन, व्हायब्रोफोन, एकॉर्डियन, सेक्सोफोन, व्हायोलिन्स आदी वाद्यांचा सहभाग असणार आहे. पूर्वी रेकॉर्डिगसाठी वापरली जाणारी ही वाद्ये प्रत्यक्ष ऐकणे हा एक अविस्मरणीय योग आहे. शनिवार ११ जानेवारी रोजी रात्री ८.४५ वाजता हा कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणार आहे. संदीप मयेकर आणि सचिन पाठक यांची संकल्पना असणाऱ्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अजय मदन यांचे आहे. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांचे निवेदन हे या वाद्य मैफलीचे एक प्रमुख आकर्षण असल्याची माहिती स्पंदनचे प्रशांत दांडेकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2014 9:08 am

Web Title: social awareness of spandan
Next Stories
1 रेल्वे प्रवास अधिक सोयीचा!
2 खड्डेमुक्तीची हमी
3 नवी मुंबईकरांना १४ प्रकल्पांचा नजराणा
Just Now!
X